पुणे – पुण्याची ताकद गिरीश बापट… राजतिलक की करो तयारी, आ रहे है भगवाधारी… मंदिर फिर बनाएंगे… भारतीय जनता पक्षाचा विजय असो… फिर एक बार मोदी सरकार अशा जोरदार घोषणा देत, भगव्या रंगाची उधळण करत केलेले जल्लोषनृत्य… एकमेकांना शुभेच्छा देत, सेल्फी, फोटो घेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला. तसेच, यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढा देखील भरविला होता. एकूणच भाजपच्या कार्यालयात गुरुवारी सकाळपासूनच विजयी जल्लोषाचा “हाय जोश’ पाहायला मिळाला.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या सुरवातीपासूनच गिरीश बापट हे आघाडीवर होते. त्यामुळे सकाळपासूनच जंगली महाराज रस्ता येथील भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी केली होती. बापट यांच्या विजयाची चाहूल लागताच, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आणि भगव्या रंगांची उधळण करत विविध गाण्यांवर ठेका धरत कार्यकर्ते जोमाने नाचत होते. तसेच, भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जयघोष करत होते. यामध्ये महिला कार्यकर्त्यांचा उत्साह देखील वाखाणण्याजोगा होता.
एकीकडे कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू असतानाचा बापट यांना विजयाबाबत शुभेच्छा देत, त्यांचे अभिनंदन करण्यासाठीदेखील अनेक नागरिक आणि पक्षाचे कार्यकर्ते येऊन भेटत होते.