पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्याला आता तडे जाऊ लागले आहेत. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चिंचवडमधील अनेकजण राष्ट्रवादीच्या वाटेवर असतानाच आता तोच कित्ता भोसरी विधानसभेतही गिरविला जाऊ लागल्याने आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यास शंभर प्लसचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपावर महापालिकेतील सत्ता गमाविण्याची वेळ येऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला झटका देत भारतीय जनता पक्षाने महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविली होती. सत्तेचा सोपान गाठताना राष्ट्रवातीलच अनेकांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. “ना भय, ना भ्रष्टाचार’, ना खाऊंगा ना खाने दुंगा, यासारख्या लोकप्रिय घोषणा करत भाजपाने शहरातील जनतेला भ्रष्टाचारमुक्त कारभाराचे आश्वासन दिले होते. मात्र प्राप्त होताच राष्ट्रवादीने केलेले भ्रष्ट कारभाराचे विक्रम मोडीत काढत भाजपाच्या नेत्यांनी नवे विक्रम प्रस्थापित केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर समोर आले आहे.
जनतेला दिलेल्या आश्वासनांचा एका बाजूला स्थानिक नेत्यांना पडलेला विसर आणि आपल्याच सग्या-सोयऱ्यांना महापालिकेच्या महत्त्वाच्या पदावर बसण्याचा दिलेला मान यामुळे राष्ट्रवादीतून आयात केलेल्या अनेकांना हक्काच्या पदापासून वंचित रहावे लागले. तर निष्ठावंत भाजपच्या नेत्यांसह अनेक नगरसेवकांना चिंचवड आणि भोसरीच्या वादाचा फटका बसला. गेली साडेचार वर्षे पदांच्या अपेक्षेने “गप्प’ बसलेले हे नेते आता ऐन निवडणुकीत भाजपासाठी डोकेदुखी ठरू लागल्याचे समोर आले आहे.
चिंचवडमध्ये पक्षांतराला सुरुवात
चिंचवड विधानसभा मतदारसंघात गतवेळी महापालिका निवडणुकीत भाजपाने अभूतपूर्व यश मिळविले होते. मात्र राज्यात झालेले सत्तांतर, पदांपासून रोखण्यासाठी झालेल्या घडामोडी, क्षमता असतानाही प्रवाहापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न यामुळे गतवेळी भाजपाता येणाऱ्यांना आता पुन्हा राष्ट्रवादीचे वेध लागले आहेत. यातील काहीजणांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पक्षात प्रवेश करण्याबाबत चर्चा केली. तर काहीजणांनी पक्षप्रवेशाचे “सोहळे’ करवून घेतले आहेत. त्यामुळे भाजपात आलबेल नसल्याचेच समोर आले आहे.
फुटीच्या उंबरठ्यावर
भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी गेल्या सात वर्षांत भोसरी विधानसभा मतदारसंघात आपल्या समर्थकांची मोठी फौज उभी करण्यात यश मिळविले होते. सन 2017 साली आपल्या समर्थकांना भाजपातून उभे करत त्यांना महापालिकेत निवडणूही आणले होते. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश करत कमळ हाती घेतले होते. मात्र गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. गतवेळी जे कट्टर समर्थक होते त्यांनीच आता बंडाचे निशान हाती घेतल्यामुळे भोसरी विधानसभेतील वरून अभेद्य वाटणाऱ्या बालेकिल्ल्याला तडे जाण्यास सुरुवात झाली आहे.
नगरसेवक रवी लांडगे यांनी महेश लांडगे यांच्या विरोधात एल्गार पुकारल्यानंतर चिखलीतील नगरसेवक संजय नेवाळे यांनीही भाजपातून बाहेर पडण्याचे जाहीर संकेत दिल्याने भोसरीतील भाजपामध्ये फुटीचे ढग अधिक गडद झाल्याचे समोर आले होते. आता लांडगे यांच्या कट्टर समर्थक समजल्या जाणाऱ्या नगरसेविका प्रियंका बारसे यांनीही लांडगे यांना थेट आव्हान दिल्यामुळे भोसरीतील भारतीय जनता पक्ष फुटीच्या उंबरठ्यावरच पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.
22 ते 25 नगरसेवक पक्षांतर करणार?
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून सत्तेच्या अपेक्षेने गतवेळी झालेल्या निवडणुकीपूर्वी भाजपात पक्षांतर केलेल्या नगरसेवकांचा शहर पातळीवर एक नाराज गट तयार झाला आहे. तर पहिल्याच प्रयत्नात भाजपाच्या तिकीटावर निवडून आलेले मात्र सत्ता आणि पदांपासून ज्या नगरसेवकांना दूर ठेवण्यात आले त्यांचीही नाराजांमध्ये भर पडली आहे. भाजपाच्या तिकीटावर पहिल्यांदा नगरसेवक झालेले व राष्ट्रवादीतून भाजपात आलेले तब्बल 22 ते 25 नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व नगरसेवकांनी पक्षांतर केल्यास भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
लाचखोरी प्रकरण भोवणार
गतवेळी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अवघ्या 25 लाख रुपयांच्या मूर्ती घोटाळ्याचे भांडवल करत राष्ट्रवादीला नामोहरण करण्यात भाजपाला यश आले होते. मात्र सत्तेत आल्यानंतर भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने शहर भाजपाची पुरती नाचक्की झाली. विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला हे आयतेच कोलित मिळाल्याने येत्या निवडणुकीत याचे भांडवल केले जाणार हे निश्चित आहे. त्यामुळे भाजपाला लाचखोरीचे प्रकरण भोवण्याचीच अधिक शक्यता आहे.