पुणे (प्रतिनिधी) : शहरातील करोना रूग्णांची स्थिती बिकट होत असल्याने पुण्यात केंद्र शासनाने लक्ष घालावे अशी मागणी करणारे शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार पुण्यातील सत्ताधारी भाजपचे अपयश लपवित असल्याची टिका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष महेश हांडे यांनी केली आहे. तसेच महापालिकेत सत्ता, एक खासदार आणि सहा आमदार असतानाही, शहरात करोनाचा प्रसार वाढला आहे. त्यामुळेच आता राज्यशासनाकडे बोट दाखविण्याचे काम भाजपने थांबवावे असेही ते म्हणाले.
जे भाजप आमदार राज्यशासनावर टिका करत आहेत. त्यांच्या मतदारसंघात करोनाचे रूग्ण लक्षणीयप्रमाणात वाढले आहेत. तर शहरातही रूग्ण वाढत आहेत. ही रूग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी शहरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. अशा स्थितीत सत्ताधारी भाजप शहरातील करोना नियंत्रणा ऐवजी टिका आणि राजकरण करण्यातच व्यस्त आहे.
शहरात करोनाचे रूग्ण आढळण्यास सुरूवात झाली तेव्हाच सत्ताधारी भाजपने प्रशासनाला विश्वासात घेऊन या स्थितीवर लक्ष दिले असते तर ही वेळ आली नसती त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच शहरात लक्ष घातले असून ते सातत्याने राज्यशासनाच्या माध्यमातून कार्यरत आहेत अशा स्थितीत भाजपने राजकीय टिका करून शहराबाबत आपली असलेली पुतना मावशीचे प्रेम पुन्हा एकदा दाखवून दिल्याची टिका हांडे यांनी केली आहे.