योगींविषयी भाजपमधूनच नाराजीचे सूर; अखिलेश यादव यांचा दावा

लखनौ – उत्तरप्रदेशातील सत्तारूढ भाजपमध्ये नेतृत्वावरून मतभेद निर्माण झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी त्यांच्या पक्षातूनच नाराजीचे सूर घुमू लागले आहेत, असा दावा समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोमवारी केला.

उत्तरप्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. ती निवडणूक कुणाच्या नेतृत्वाखाली लढवणार याविषयी प्रदेश भाजपमधून वेगवेगळी भूमिका मांडली जात आहे. त्याचा संदर्भ घेऊन अखिलेश यांनी प्रतिक्रिया दिली. उत्तरप्रदेश भाजपमधील स्थिती हास्यास्पद असल्याचा शाब्दिक टोलाही त्यांनी लगावला.

मागील काही दिवसांपासून अखिलेश सातत्याने भाजपवर आणि योगींवर टीकास्त्र सोडत आहेत. योगी सरकारला सर्व आघाड्यांवर अपयश आले आहे. भाजपला सत्तेवरून हटवण्याचे मन उत्तरप्रदेशातील जनतेने बनवले आहे. त्यामुळे भाजपने कुणालाही चेहरा बनवले तरी फरक पडणार नाही, असे त्यांनी याआधी म्हटले होते.

त्यासाठी त्यांनी भाजपमध्ये उत्तरप्रदेशसंदर्भात बैठकांचे सत्र सुरू असल्याचा आधार घेतला होता. भाजपच्या बैठकांमुळे उत्तरप्रदेशात सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र पुढे आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.