सहा की बारा सदस्य बाहेर पडणार : भाजपा नेत्यांचा निर्णय गुलदस्तात
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीमधील 8 सदस्यांची मुदत येत्या 19 फेब्रुवारी रोजी संपुष्टात येत आहे. स्थायीमध्ये काम करण्यासाठी भाजपा पूर्वीप्रमाणे एक वर्षाचा कालावधी देणार की दोन वर्षांचा याबाबतचा निर्णय गुलदस्तात असल्याने भाजपा नगरसेवकांमध्ये कमालीची अस्वस्थता पहावयास मिळते. त्यामुळे स्थायीतून भाजपाचे सहा सदस्य बाहेर पडणार की 12 याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थायी समितीमध्ये भाजपाचे बहुमत आहे. सन 2017 साली महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर जास्तीत जास्त नगरसेवकांना स्थायीमध्ये काम करण्याची संधी मिळावी, यासाठी एक वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार पहिली दोन वर्षे त्याची अंमलबजावणीही करण्यात आली. मात्र, गतवर्षी एक वर्ष पूर्ण झालेल्या सदस्यांना दुसऱ्या वर्षीही काम करण्याची संधी दिल्याने एकवर्षाचा नियम गतवर्षी मोडण्यात आला होता. त्यामुळे दोन वर्षे काम करण्याची संधी कायम ठेवावी, यासाठी एक वर्ष पूर्ण झालेल्या सदस्यांचा आग्रह आहे. एक वर्ष की दोन वर्षे याबाबतचा निर्णय भाजपा पक्षश्रेष्ठींनी गुलदस्तात ठेवला आहे.
काही सदस्यांच्या मते यावर्षीपासून पुन्हा एक वर्षाचा निर्णय घेतला जाणार असून, सध्या स्थायीत कार्यरत असलेल्या भाजपाच्या 12 सदस्यांना बाहेरचा रस्ता दाखविला जाईल. कालावधी संपुष्टात येणाऱ्या 6 सदस्यांच्या जागी नवे सदस्य नियमानुसार येणार असून, उर्वरित सहा सदस्यांचे राजीनामे घेतले जाणार आहेत. याबाबत चर्चा सुरू झाल्यामुळे एक वर्ष पूर्ण झालेल्या सदस्यांमध्ये चांगलीच अस्वस्थता दिसून येत आहे.
तर कालावधी संपुष्टात येणाऱ्या सदस्यांच्या जागी आपलीच वर्णी लागावी, यासाठी अनेकांनी फिल्डींग लावली आहे. सत्तावाटपानुसार आमदार जगताप यांचे तीन तर आमदार लांडगे यांचे तीन समर्थक स्थायीमध्ये येण्याची शक्यता आहे. या वेळी निष्ठावंतांना पुन्हा “वाटाण्याच्या अक्षता’च मिळण्याची शक्यता असल्याने निष्ठावंत गटामध्येही चांगलीच चलबिचल सुरू आहे.