बंगळूर -अडचणीत आलेल्या कर्नाटक सरकारची आणखी कोंडी करण्यासाठी भाजपने बुधवारी विधानसभेबाहेर निदर्शने केली. बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यामुळे सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली.
निदर्शनांनंतर भाजपच्या शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेतली. बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यांवर तातडीने निर्णय घेण्याचा सल्ला सभापतींना द्यावा, अशी मागणी त्या भेटीत करण्यात आली. सत्तारूढ आघाडीचे आणखी काही आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे.
आता तरी मुख्यमंत्र्यांनी वास्तव समजून घेऊन राजीनामा द्यावा, असे येडियुरप्पा नंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. कर्नाटक सरकारपुढे उभ्या राहिलेल्या संकटामागे भाजप असल्याचा सत्तारूढ आघाडीचा आरोप त्यांनी फेटाळून लावला.