बारामतीत भाजपचा भ्रमाचा भोपळा फुटला

पूर्वतयारी न करताच उमेदवार उभा करणे आले अंगलट

प्रमोद ठोंबरे

बारामती – विकासाच्या बाबतीत बारामतीसारखी 100 शहरे देशात निर्माण झाली पाहिजेत. विकासाचे “आदर्श मॉडेल’ म्हणून बारामतीची राज्याला आणि देशाला ओळख आहे. अशी कौतुकाची स्तुतिसुमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सर्वांनी यापूर्वी उधळली आहेत. असे असताना देखील बारामती सारख्या मतदारसंघात कोणतीही पूर्वतयारी न करता ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार घोषित करून बारामती जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपचा “भ्रमाचा भोपळा फुटला’ आहे.

बारामतीकरांची अस्मिता जागी झाली
बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने कमळाचे चिन्हावर कांचन कुल यांची उमेदवारी ऐन निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केली, त्यानंतर बारामतीची जागा निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट तसेच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जंगजंग पछाडले. प्रचारादरम्यान भाजपाचे स्टार प्रचारकांनी बारामतीत येऊन पवार कुटुंबाविषयी टीका केली. जसजशी टीकेची झोड उठत गेली तशी राष्ट्रवादी तसेच पवार यांच्याविषयी बारामतीकरांची अस्मिता जागी झाली. त्यामुळे सुळे यांना 2014 च्या पेक्षा जास्त निवडणुकीत मताधिक्‍य मिळाले.

बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दीड लाखांपेक्षा अधिक मताधिक्‍य मिळवत हॅटट्रिक साधली तर केवळ राजकीय घराण्यांचा शिक्‍का असलेल्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना दारूण पराभव स्वीकारावा लागला. मावळ लोकसभामतदारसंघात केवळ राजकीय घराणे म्हणून पार्थ पवार यांना तिकीट देण्याची चुक राष्ट्रवादीने केली तशीच चुक कांचन कुल यांना उभे करून भाजपला भोवली असेच या निकालावरून स्पष्ट झाले असून घराणेशाहीला यापुढे थारा नाही असेही या निकालावारुन स्पष्ट झाले आहे.

कार्यकर्त्यांना पाठबळाचा अभाव
विजयासाठी प्रयत्न करत असताना मतदारसंघाची बांधणी करण्यासाठी भाजपकडून गेल्या पाच वर्षांत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. सत्तेत असताना देखील कार्यकर्त्यांचा संच उभा करण्यात त्यांना अपयश आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार घोषित करणे ही त्यांची सर्वात मोठी चूक मानली जात आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी किमान 10 वर्षांची तयारी महत्त्वाची आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार घोषित करून भाजपा राष्ट्रवादीचा हा किल्ला हस्तगत करण्याचे स्वप्न पाहिले, हे एकप्रकराचे धाडसच म्हणावे लागेल. सत्तेत असताना देखील कार्यकर्त्यांना पाठबळ दिले जात नाही. त्यामुळे मतदारसंघाची बांधणी होऊ शकत नाही.

बारामती विधानसभा मतदारसंघात दुपटीने मताधिक्‍य
बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती विधानसभा मतदारसंघाने सुप्रिया सुळे यांना 1 लाख 28 हजारांचे मताधिक्‍य दिले. त्याच्या जोरावर सुप्रिया सुळे यांनी विजयाची दणदणीत हॅट्ट्रिक नोंदविली. 2014च्या निवडणुकीतील मिळालेल्या मताधिक्‍याची अन्‌ यंदाच्या निवडणुकीत देखील मिळालेल्या मताधिक्‍याची चर्चा चांगलीच रंगली. 2014 इतके मताधिक्‍य मिळणार की त्याहून कमी होणार अशा शंकाही उपस्थित झाल्या. बारामतीच्या मतांवर यावर सुळे यांच्या विजयाच्या गणितांची जुळवाजुळव करावी लागणार ही बाब लक्षात येताच बारामतीकरांनी सुळे यांना भरभरून मतदान केले. त्यामुळे 2014 च्या तुलनेत सुळे यांना 2019 च्या निवडणुकीत दुपटीने मताधिक्‍य मिळाले.

शरद पवारांची रणनिती
एनडीए विरोधात गटबंधन जुळवण्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे “बेटी गिरनी चाहिये’ असे म्हणतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यापर्यंत सर्वांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून पवार कुटुंबीयांना बारामतीत रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच बारामतीची जागा जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. ही बाब लक्षात येताच राजकीय सारीपाटावर महत्त्वाचे स्थान असलेले शरद पवार यांनी अशी काही रणनीती आखली की भाजपने टाकलेले सर्व डाव फेल ठरले. पवार यांनी मतदारसंघातील जनसंपर्क वाढवत स्थानिक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या तसेच दौंडसह इतर मतदारसंघात देखील घोंगडी बैठक वजा कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. पवार यांच्या प्रयत्नांवर सुरुवातीला टीकादेखील करण्यात आली. मात्र, निकालानंतर भाजपचा उमेदवाराचा दारुण पराभव झाला, त्यावेळी पवार यांची रणनीती सर्वांच्या लक्षात आली.

“वंचित फॅक्‍टर’चा परिणाम नाही
2014 च्या निवडणुकीत एका विशिष्ट समाजाने जानकर यांना मतदान केल्याने राष्ट्रवादीचे माताधिक्‍य कमी झाले. मात्र, 2019 मध्ये असे घडणार नाही असे विधान शरद पवार यांनी केले होते. त्यांनी वर्तवलेला अंदाज अचूक ठरला. धनगर समाजाबाबत वर्तवलेले हे विधान खरे ठरले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज नाराज होता. त्यामुळे भाजपच्या उमेदवारास या समाजाने नाकारले. अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण करीत मराठा समाजाने देखील राष्ट्रवादीच्या उमेदवारास पसंती दिली. बारामती लोकसभा मतदारसंघात “वंचित फॅक्‍टर’चा परिणाम जाणवला नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.