विद्यमान अध्यक्षांसह अन्य पक्षातून आलेल्या पाच सदस्यांची स्थायी समितीवर नियुक्ती
पुणे – महापालिका स्थायी समितीच्या रिक्त होणाऱ्या जागांवर सत्ताधारी भाजपने अपेक्षेप्रमाणे विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांची फेरनिवड केली आहे. त्याचवेळी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अन्य पक्षातून आलेल्या पाच सदस्यांना वर्षभरासाठी का होईना स्थायी समितीवर संधी देऊन “डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न केल्याचे दिसून येते.
स्थायी समितीतील 16 पैकी 8 सदस्य निवृत्त होत आहेत. यामध्ये भाजपचे सहा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. भाजपने चार वर्षांच्या सत्ताकाळात प्रामुख्याने मूळच्या भाजपच्याच सदस्यांना प्रमुख पदांवर आणि समित्यांमध्ये स्थान दिले आहे. त्यामुळे अन्य पक्षातून आलेले आणि भाजपकडून नगरसेवक झालेल्या मोठ्या गटामध्ये असंतोष पसरला आहे. महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदी तिच मंडळी पुढील वर्षभर कायम ठेवण्यात येणार असल्याने नगरसेवकांमध्ये असंतोष उफाळून आला आहे.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून “डॅमेज कंट्रोल’साठी पावले उचलण्याला सुरुवात केली आहे. नगरसेवकांना मुंबईतील रामभाऊ म्हाळगी संस्थेत दोन दिवसांचे प्रशिक्षण, भाजपचे खासदार गिरीश बापट, प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महापालिका भेट, केंद्रीय नेते प्रकाश जावडेकर, नितीन गडकरी यांची पुणे भेट हा एक वातावरण निर्मितीतून “डॅमेज कंट्रोल’ करण्याचाच प्रयत्न होता. परंतु, स्थायी समितीची आठ सदस्यांची निवड तोंडावरच असल्याने या सदस्यांनी त्याची मागणी केली.
त्यामुळे त्यांना त्या जागा दिल्याशिवाय गत्यंतर नसल्याचे पक्षाच्या निदर्शनास आले आणि रासने वगळता नाराजांचे पुनर्वसन पाच जागांवर केले. त्यांना किमान एक वर्ष स्थायी समितीवर काम करण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान स्थायी समिती अध्यक्षपदासाठी पुढील महिन्याच्या आठवड्यात निवडणूक होणार असून, रासने यांनाच पुन्हा अध्यक्षपदी संधी मिळणार असल्याचे त्यांच्या नियुक्तीवरून दिसून येत आहे.
नियुक्त सदस्यांची नावे
हेमंत रासने, राजाभाऊ लायगुडे, मनीषा कदम, महेश वाबळे, अर्चना पाटील, राहुल भंडारे (भाजप), सुनील उर्फ बंडू गायकवाड, प्रदीप गायकवाड (रा.कॉं)
ओसवाल हे पदावर कायम राहणार की राजीनामा देणार, याची उत्सुकता
स्थायी समितीमध्ये शिवसेनेकडून नगरसेवक बाळा ओसवाल हे सदस्य आहेत. महापालिकेत शिवसेनेचे दहा सदस्य असून, प्रत्येक सदस्याला स्थायी समितीमध्ये एक वर्ष संधी देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. त्यानुसार यापूर्वीही शिवसेनेच्या सदस्याने राजीनामा देऊन स्थायी समिती सोडली आहे. परंतु, मागील वर्ष करोनामुळे कामाची संधीच मिळाली नाही. त्यामुळे पुढील वर्ष संधी द्यावी, अशी मागणी ओसवाल यांनी पक्षाकडे केली आहे. त्यामुळे त्यांनी समिती सदस्यपदाचा राजीनामा अद्याप दिला नाही. मात्र, आता ते कायम राहाणार की पुढील महिन्याभरानंतर पक्ष त्यांचा राजीनामा घेऊन अन्य सदस्याला संधी देणार, याची उत्सुकता आहे.