नवी दिल्ली – देशाच्या 15व्या राष्ट्रपतींची प्रतीक्षा आज संपणार आहे. आज सकाळी 11 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान झाले होते. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात थेट लढत होत असली तरी द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित मनाला जात आहे. त्यामुळे भाजपने देशातील 1.30 लाख आदिवासी गावांमध्ये जल्लोषाची जय्यत तयारी केली आहे.
मुर्मू यांच्या विजयाचा आत्मविश्वास असल्याने भाजप निकालानंतर दिल्लीत विजयी मिरवणूक काढणार आहे. राष्ट्रपतींच्या विजयानंतर मिरवणूक काढण्याची ही पहिलीच वेळ असेल. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा राजपथपर्यंत मिरवणुकीचे नेतृत्व करतील. तेथे भाषण देखील करणार आहेत. पहिल्यांदाच आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून निवडून आल्याचे श्रेय पंतप्रधान मोदींना दिले जाण्याची शक्यता आहे.
मात्र, मुर्मू या मिरवणुकीत सहभागी होणार नाहीत. जर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जिंकल्या तर त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती बनतील. यापूर्वी आजपासून 15 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 21 जुलै रोजी देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या. प्रतिभा देवीसिंह पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या.
25 रोजी शपथ विधी
आज 21 जुलै रोजी मतमोजणी झाल्यानंतर देशाच्या नव्या राष्ट्रपतींची घोषणा केली जाणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलैच्या मध्यरात्री संपत आहे. 25 जुलै रोजी नवीन राष्ट्रपतींचा शपथविधी होणार आहे.
द्रौपदी मुर्मू: कनिष्ठ सहाय्यक, शिक्षिका… आता राष्ट्रपतींची जबाबदारी
– 20 जून 1958 रोजी ओडिशातील एका खेडेगावात जन्म. पदवीपर्यंतचे शिक्षण
– 1979 ते 1983 या काळात पाटबंधारे विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणून काम पहिले
– 1994 ते 1997 या काळात त्या शिक्षिका म्हणून कार्यरत
– 1997 मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश. रायरंगपूर नगरपालिकेतून भाजपच्या विजयी नगरसेविका, नंतर अध्यक्ष
– पती बँकेत कर्मचारी पती