मुंबई : परमबीर सिंग यांच्या माध्यमातून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्याविरोधात घटनाक्रम घडवण्यात आला आहे. परमवीरसिंग यांना वाचवण्यासाठी (NIA) एनआयएने त्यांना आश्वासित केले त्यामुळे (NIA) एनआयएच्या चार्जशीटमध्ये परमबीर सिंग यांना आरोपी करण्यात आलेले नाही. त्यांना वाचवण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप करण्याचे कटकारस्थान भाजपच्या माध्यमातून झाल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर बोलताना केला आहे.
एनआयएने दाखल केलेल्या चार्जशिटनुसार सायबर एक्सपर्टच्या माध्यमातून बोगस पुरावे तयार करण्यासाठी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी ५ लाख रुपये दिले होते. अँटिलिया प्रकरणात सचिन वाझे यांना मुख्य आरोपी करण्यात आले आहे. परमबीर सिंग यांनी सचिन वाझे यांना पोलिस सेवेत सामावून घेतले, त्यांना विशेष अधिकार देण्यात आले, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशदेखील वाझे यांना माजी पोलिस आयुक्तांनी दिले. या प्रकरणाबाबत माजी पोलिस आयुक्त दिशाभूल करत असताना विधानसभेत या केसबाबत विविध विषय समोर येत होते.
एटीएसने या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली असता त्यांना खात्री वाटली की सचिन वाझेच्या माध्यमातून हा घटनाक्रम घडवण्यात आला आहे. नंतर अँटिलिया केसचा ताबा एनआयएने घेतला. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना वाचवण्याचे आश्वासित करण्यात आले. त्यामुळे एनआयएच्या चार्जशीटमध्ये परमबीर सिंग यांना आरोपी करण्यात आले नाही. या केसमधून त्यांना वाचवण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप करण्याचे कट-कारस्थान भारतीय जनता पक्षाकडून झाले आहे. या चार्जशीटमधून मुख्य आरोपींना बगल देण्यात आली आहे. त्यांची कुठेही चौकशी झालेली नाही, त्यांना आरोपी करण्यात आलेले नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
एक्स्टॉर्शनसाठी हे सर्व कटकारस्थान वाझेंनी केले, यात पूर्ण सत्यता आहे, असे आमचे मत नाही. या प्रकरणातून अजून बऱ्याच गोष्टी बाहेर पडण्याची शक्यता होती पण एनआयएने तसा तपास केला नाही. काही लोकांना वाचवण्याचे काम केले आहे. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर जे आरोप केले त्यासाठी त्यांना एनआयएकडून जीवनदान देण्यात आले आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.