पुन्हा सत्तेवर येण्याचा भाजपचा दावा

मुंबई – देशातील जनतेचा मूड लक्षात घेता भाजपाला देशात 300 पेक्षाही जास्त तर महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना महायुतीला 42 पेक्षाही जास्त जागा मिळणार आहेत. त्यात बारामती व नांदेड या जागांचाही समावेश असेल, असा विश्वास भाजपा नेते व केंद्रिय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.

मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत प्रकाश जावडेकर बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेहनती आणि इमानदार नेते असून त्यांच्याच हातात देश सुरक्षित असल्याने त्यांना पुन्हा एकदा संधी दयावी असे देशातील जनतेला वाटते.कॉंग्रेस आघाडीच्या काळात देशात सातत्याने स्फोट होत होते.पण गेल्या पाच वर्षांत जम्मू-काश्‍मिरचा भाग वगळता सर्वत्र शांतता आहे.महागाई नियंत्रणात आहे व गरिबांना त्यांच्या योजनांचे पैसे कोणत्याही दलालीविना थेट मिळत आहेत.कॉंग्रेसच्या काळात धोरण लकवा होता,दहशतवादयांशी नरमाईचे धोरण होते,महागाई होती रोज भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत होती.पण आता लोकांना फरक जाणवत असल्याचे जावडेकर म्हणाले.

राफेलबाबत केलेल्या वक्‍तव्यावर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाची माफी मागावी लागली आहे.राहुल गांधी यांचा खोटारडेपणा यामुळे उघड झाला असून यामुळे कॉंग्रेस म्हणजे खोटारडेपणा व राफेल म्हणजे राहुलफेल हे दिसून आल्याची टीकाही जावडेकर यांनी केली.


राहुल गांधींचा खोटा प्रचार
गेली पाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नसल्याने निराश झालेल्या राहुल गांधी यांनी खोटारडा प्रचार सुरू केला.पण न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर राहुल गांधी यांना अखेर माफी मागावी लागली आहे.अशा खोटारडेपणाने कधीच सत्य पराजित होत नसते.पण कॉंग्रेस पक्षाची विश्वासार्हता मात्र संपत चालल्याचे जावडेकर म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.