मुंबई – बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्यानिमित्ताने उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी शिवशक्ती भीमशक्तीचा नारा देत आगामी निवडणुकांसाठी युती करणार असल्याचे स्पष्ट केले. गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे-आंबेडकर यांच्यातील युतीची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती अखेर यावर शिक्कामोर्तब झालं. यावरूनच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांचा काही भरोसा नाही ते उद्या एमआयएमशी देखील युती करतील असं खोचक टोला बावनकुळेंनी लगावला आहे.
माध्यमांशी संवाद साधत बावनकुळे यांनी सध्याच्या ठाकरे गटाच्या राजकीय समीकरणाबाबत भाष्य केले. कितीही पक्ष एकत्र आले तरी भाजपचं काहीही करू शकत नाही. बाळासाहेब आंबेडकर म्हणजे भीमशक्ती नाही,आमच्यकडे देखील भीमशक्ती आहे. आम्ही ५१ टक्क्यांची तयारी केली असल्याचे स्पष्ट मत यावेळी बावनकुळेंनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना बावनकुळेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची देखील आठवण करून दिली. उद्धव ठाकरेंबाबत बोलताना ते म्हणाले, २०२१ मध्ये राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले. सावरकरांनावर टीका करणाऱ्या काँग्रेस सोबत गेले. शिवसेना बंद करेल पण काँग्रेस सोबत जाणार नाही. तसेच माझ्या आयुष्यात काही झालं तरी चालेले परंतु मी प्रकाश आंबेडकरांसोबत जुळवून घेणारं नाही हे बाळासाहेबांचे तत्व होते. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबाच्या विचारांना तिलांजली दिली असल्याचे देखील बावनकुळे यावेळी म्हणाले. तसेच मला वाटत उद्या तर उद्धव ठाकरेंवर ही परिस्थिती येईल आणि ते एमआयएमच्या ओवेसींसोबत बसतील अशी टीका देखील बावनकुळेंनी यावेळी केली.