ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांनी नुकतीच भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगत प्रकाश ऊर्फ जे. पी. नड्डा यांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले. ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशा अफवा पसरल्या आहे.
भाजपमध्ये प्रवेश करणार या अफवा फेटाळून लावत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा म्हणाले की, “मला जर जायचं असेल तर मी खुलेपणाने जाईन. लपूनछपून नव्हे. नड्डाजी माझे जुने मित्र असून, माझ्याप्रमाणेच तेही हिमाचल प्रदेशचे आहेत आणि आम्ही एकाच विद्यापीठात शिकलो आहोत.’ अर्थात, असे खुलासे ऐकण्याची आता आपल्याला सवय झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मैत्री जुनीच असून, यापूर्वी जेव्हा जेव्हा शिंदे यांना आपण शिवसेनेची साथ सोडणार आहात का, असे विचारले असता त्यांनी नकारार्थीच उत्तर दिले होते.
नड्डाजींशी माझे सामाजिक आणि कौटुंबिक संबंध असून, माझ्या राज्यातील एक व्यक्ती आज सत्तारूढ पक्षाची अध्यक्ष असल्याचा मला अभिमान आहे असे सांगून, वैचारिक मतभेदांचे रूपांतर वैयक्तिक दुश्मनीत होऊ नये, असे आपले मत असल्याचे प्रतिपादन शर्मा यांनी केले आहे. हिमाचल प्रदेश युनिव्हर्सिटी ऍल्युम्नी असोसिएशनने शर्मा आणि नड्डा यांचा सत्कार करण्याचे ठरवले आहे. त्याबाबत उभयतांची भेट झाली असेल. परंतु यापूर्वीदेखील शर्मा हे नड्डाजींना भेटले असल्याचे सांगण्यात येते.
आनंद शर्मा हे कॉंग्रेसमधील “जी-23′ या बंडखोर गटातील एक नेते आहेत. आपल्या नड्डाजींबरोबरच्या भेटीगाठींमधून कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असा शर्मा यांचा आग्रह आहे. शर्मा हे माजी केंद्रीय मंत्री असून, अनेक वर्षे कॉंग्रेसचे प्रवक्ते म्हणूनदेखील त्यांनी काम केले आहे. तसेच राज्यसभेत ते कॉंग्रेसचे उपनेते होते. गेल्या मार्चमध्ये त्यांची राज्यसभेची टर्म संपली आणि त्यांना त्यानंतर पुन्हा संधी देण्यात आली नाही. 2019 मध्ये कॉंग्रेसमधील 23 ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना खुले पत्र लिहून, संघटनात्मक पुनर्रचना करावी आणि पूर्णवेळ पक्षाध्यक्ष नेमावा, अशी मागणी केली.
या बंडखोर नेत्यांनी राहुल गाधी हे अध्यक्ष बनण्यास विरोध केला नव्हता. तर, निवडणुका घेऊन अध्यक्ष बनवा आणि राहुल वा अन्य कोणीही अध्यक्ष बनल्यास त्याने पूर्णवेळ पक्षाला वाहून घ्यावे, अशी मागणी केली होती. ही मागणी करणाऱ्यांमध्ये आनंद शर्मा यांचाही समावेश होता; परंतु खुद्द शर्मा यांनी एकदाही लोकसभेतून वा विधानसभेतून निवडणूक लढवलेली नाही. ते सातत्याने राज्यसभेतूनच खासदार झाले आहेत. कॉंग्रेसमधील बंडखोर नेते गुलाम नबी आझाद राज्यसभेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांचा एक गौरव समारंभ जम्मू-काश्मीरमध्ये झाला. त्या समारंभास शर्मा हेदेखील उपस्थित होते आणि त्यांनी कॉंग्रेस नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका केली होती.
गेल्या वर्षी सप्टेंबरात माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे माजी नेते कपिल सिब्बल यांनी अध्यक्षपदाबाबत केलेल्या वक्तव्यावरून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरावर हल्ला केला होता. त्यावेळी, या निंदनीय कृतीमुळे पक्षाची बदनामी होते आणि याचा तीव्र निषेध केला पाहिजे. कारण, अभिव्यक्तिस्वातंत्र्य जतन करण्याची कॉंग्रेसची परंपरा आहे, असे मत शर्मा यांनी व्यक्त केले होते. लवकरच हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार असून, शर्मा आपल्या पक्षात आल्यास त्याचा काही ना काही लाभ होऊ शकेल, असा भाजपचा हिशेब असू शकतो. शर्मा हे जनाधार असलेले नेते बिलकुल नाहीत. मात्र, राजीव गांधी यांच्यापासूनचा कॉंग्रेसचा एक बडा नेता आपल्याकडे आला आहे, कॉंग्रेसच्या कळपात कोणीही राहू इच्छित नाही, असा संदेश यामुळे लोकांपर्यंत जाऊ शकतो, हे भाजपला पक्के ठाऊक आहे. मात्र, पूर्वी आनंद शर्मा यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे, हे विसरता येणार नाही.
भारत हा आज नव्हे, तर तीस वर्षांपूर्वीच लस उत्पादनात अग्रेसर होता, त्यात मोदी सरकारची काही एक कर्तबगारी नाही, अशी टीका त्यांनी केली होती. मोदी सरकारच्या काळातील पेट्रोल-डीझेल दरवाढ, अफाट महागाई, प्रचंड बेरोजगारी आणि वाढलेली धर्मांधता यावर शर्मा यांनी चौफेर टीका केली आहे. शर्मा हे उदयपूरला झालेल्या कॉंग्रेसच्या चिंतन शिबिराचा एक भाग होते. या शिबिरानंतर ते सोनियाजींच्या विशेष सल्लागार गटाचे सदस्य होते. मात्र, जेव्हा राज्यसभेची तिकिटे देण्याची वेळ आली, तेव्हा जी-23 गटातील आजाद, शर्मा वगैरे नेत्यांची उपेक्षा करण्यात आली.
या गटातील केवळ मुकुल वासनिक यांना तिकीट देण्यात आले. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावले, तेव्हा कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी देशभर आणि खास करून नवी दिल्लीत सातत्याने निदर्शने केली. परंतु या निदर्शनांत शर्मा हे कुठेही दिसले नाहीत. गेल्या काही महिन्यांत मोदी सरकारबद्दल शर्मा यांनी “ब्र’देखील काढलेला नाही. वास्तविक नुपूर शर्मा प्रकरणात त्यांनी तोंड उघडले असते, तर बरे झाले असते.
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी, ते ठाकरे सरकारात मंत्री असताना भाजपच्या विरोधात कधीही तोंड उघडलेले नव्हते. ईडीशाहीवरही त्यांनी कधी टीका केली नव्हती. शर्मा यांच्यासारख्या ज्येष्ठ व अनुभवी नेत्याने लोकप्रियता नसताना कॉंग्रेसने एवढी पदे आपल्याला दिली, याबद्दल कृतज्ञता बाळगून पक्षासाठी समर्पितपणे काम केले पाहिजे. उद्या भाजपला फायदा होईल, अशी कोणतीही कृती त्यांनी करता कामा नये.