‘केवळ निवडणुका जिंकणे हा भाजपचा उद्देश नसून देशाला सुपर पॉवर बनविण्याचे ध्येय’

पुणे – पुढील काळात राजकीय आणि वैचारिक लढा भाजपविरोधात अन्य पक्ष असा होणार आहे. त्यासाठी संघटनात्मक वाढीबरोबर कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक स्पष्टता निर्माण करायची आहे. केवळ निवडणुका जिंकणे हा भाजपचा उद्देश नसून देशाला वैभवापर्यंत नेऊन जगातील सुपर पॉवर बनविण्याचे ध्येय असल्याचे विचार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्‍त केले.

भाजपच्या 41 व्या वर्धापनदिनानिमित्त शहर कार्यालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमानंतर व्हर्च्युअल रॅलीदरम्यान पाटील बोलत होते. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, सरचिटणीस राजेश पांडे, गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, दीपक पोटे आदी उपस्थित होते.

शहराध्यक्ष मुळीक म्हणाले, भाजप ही देशासाठी काम करणारा पक्ष आहे. गोरगरीबांची दुःख दूर करणारी संघटना अशी पक्षाची ओळख आहे. सर्वसामान्य कार्यकर्ते पक्षाला पुढे नेत आहेत. करोनावर मात करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने संघटनास्तरावर लसीकरणाची मोहीम व्यापक करण्याची मोहीम सुरू केली आहे. यासाठी नोंदणी, जनजागृती आणि मार्गदर्शन या तीनस्तरावर काम करण्यात येणार आहे.

खासदार बापट म्हणाले, भाजप जगातील एक नंबरचा पक्ष आहे. या पक्षाला वैचारिक बांधिलकी आहे. देश, धर्म, समाज आणि समाजातील सामान्य माणसाचा विचार करून पक्ष कार्य करीत आहे. लोकशाहीत राजकीय जीवनात कसे काम करावे याचा आदर्श या पक्षाने घालून दिला. कार्यकर्ता हा पक्षाचा प्राण आहे. वैचारिक बैठक पक्‍की असल्याने पक्ष कधी थांबला नाही. देशापेक्षा कोणी मोठा नाही हा आदर्श घालून दिला. आजचा दिवस संकटावर मात करणारी उर्जा देणारा आणि कर्तव्याची जाणीव करून देणारा आहे.
तर, भाजपचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान आहे.

देशाच्या प्रगती आणि राष्ट्रवादाचा प्रवास म्हणजेच भाजपचा प्रवास आहे. लोकांचा विश्‍वास संपादन करण्यात भाजप यशस्वी ठरला आहे. अविरतपणे जनतेची सेवा करीत आहोत. या पक्षाची उभारणी वंशपरंपरेवर झालेली नसून विचार आणि तत्त्वावर आधारित असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.