दूधदर अनुदानाचा प्रश्न; घोषणाबाजीसह पोवई नाका व मोती चौकात निदर्शने
सातारा (प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली दूध दराच्या अनुदानासाठी साताऱ्यात शनिवारी निदर्शने करण्यात आली. शेतीपूरक व्यवसायांना अनुदान मिळावे, या मागणीसाठी भाजप समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
शहरात झालेल्या आंदोलनात भाजप शहराध्यक्ष आणि नगरसेवक विकास गोसावी, नगरपालिकेचे उपाध्यक्ष किशोर शिंदे, सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, जयदीप ठुसे, विट्ठल बलशेटवार, नगरसेवक अविनाश कदम, धनंजय जांभळे, विजय काटवटे, मिलिंद काकडे, सौ. प्राची शहाणे, डॅनियल फरांदे, जिल्हा कोषाध्यक्ष किशोर गोडबोले, माजी नगरसेवक किशोर पंडित, उपाध्यक्ष अप्पा कोरे, सौ. मनीषा पांडे, चंदन घोडके, चिटणीस रवी आपटे, संतोष प्रभुणे, लक्ष्मण चव्हाण, सौ. वैशाली टंकसाळे, माजी शहराध्यक्ष सुनील काळेकर, महिला मोर्चा अध्यक्ष सौ. रिना भणगे, जिल्हा पदाधिकारी सौ. सुनिशा शहा, युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम बोराटे, युवती मोर्चा अध्यक्ष दीपिका झाड, वैद्यकीय आघाडी जिल्हा पदाधिकारी डॉ. उत्कर्ष रेपाळ, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा पदाधिकारी शैलेंद्र कांबळे, ज्येष्ठ नागरिक आघाडीचे अध्यक्ष प्रकाश शहाणे, अमोल कांबळे, किशोर गालफाडे, धीरज घाडगे, डॉ. सचिन साळुंखे, प्रशांत जोशी, औद्योगिक आघाडीचे अध्यक्ष रोहित साने, कामगार आघाडी अध्यक्ष तानाजी भणगे, अविनाश पवार व पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले. सातारा शहरात पोवई नाका आणि मोतीचौक या दोन्ही ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले.
भाजप नेहमीच शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदारांना दि. 21 जुलै रोजी याबाबतचे निवेदन दिले होते. आजपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी या तीन चाकांच्या सरकारने कोणतेही काम केले नाही, शेतकऱ्यांचा खोटा कळवळा आणून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम हे सरकार करत आहे. यापुढेही अशीच परिस्थिती राहिली तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवेंद्रराजे भोसले यांनी यावेळी दिला.