महाजनादेश यात्रेमुळे जिल्ह्यात भाजप कार्यकर्ते “चार्ज’

संग्रहित छायाचित्र....

जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍नांवर मुख्यमंत्री काय बोलणार, याची उत्सुकता

उदयनराजे यांचे “तळ्यात-मळ्यात’

खा. उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश सातत्याने लांबणीवर पडत आहे. भाजपमधील काही चाणक्‍यांचा विरोध आणि उदयनराजेंच्या राजकीय पुनर्वसनाबाबतच्या अटी याला कारणीभूत आहेत. स्वत: उदयनराजे यांचेही “तळ्यात-मळ्यात’ चालले आहे. मुख्यमंत्री दौऱ्यात काही राजकीय संदर्भ जुळतील, अशा अटकळी होत्या. मात्र, महाजनादेश यात्रेत कोणाचाही पक्ष प्रवेश होणार नाही, असे प्रदेश पातळीवरील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री दौऱ्यानंतर उदयनराजे यांच्या प्रवेशाचा निर्णय मुंबईतच होण्याची दाट शक्‍यता आहे.

सातारा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने भाजपचे सातारा जिल्ह्यातील केडर चांगलेच “चार्ज’ झाले आहे. पूरस्थितीत जिल्ह्यात झालेले साडेतीनशे कोटी रुपयांचे नुकसान, महसूल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, वैद्यकीय कॉलेजसाठी जमिनीचे रेंगाळलेले हस्तांतरण, सातारा शहराची प्रलंबित हद्दवाढ यावर मुख्यमंत्री काय बोलणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेची सांगता सोलापूरमध्ये झाली होती. सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांमधील राजकीय संवेदनशीलता लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या सातारा जिल्हा कार्यकारीणीचा आग्रह मोडला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली सभा साताऱ्यात दि. 15 रोजी दुपारी सातारा सैनिक स्कूलच्या मैदानावर तर दुसरी सभा कराड दक्षिण मतदारसंघात होणार आहे. तत्पूर्वी महाजनादेश यात्रेचा रथ पुणे जिल्ह्यातील भोरवरून मांढरदेवमार्गे वाईत येणार आहे. मदन भोसले यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. वाई, पाचवड, आनेवाडी, लिंब खिंड, मोळाचा ओढा, बुधवार नाका, मोती चौक व गोलबागेला वळसा मारून यात्रा पोवई नाक्‍याकडे जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे

प्रलंबित प्रश्‍नांमुळे असंतोष
मेगा भरतीचे नियोजन करून भाजपने जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या अडचणी वाढवल्या आहेत. सातारा, महाबळेश्‍वर, वाई, कोरेगाव व कराड तालुक्‍यांमध्ये भाजपची संघटना चार्ज झाली आहे. आठ मतदारसंघात भाजपने रसद गोळा करून ठेवल्याने यंदा बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी अडचणीत आली आहे. माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, कॉंग्रेसचे मदन भोसले, माजी आमदार जयकुमार गोरे यांच्यासारखे दिग्गज भाजपच्या गळाला लागल्याने राजकीय चुरस तीव्र झाली आहे. भाजपची राजकीय गणिते यशस्वी होत असली तरी जिल्ह्यातील रखडलेल्या प्रश्‍नांमुळे जनतेत असंतोष आहे. पीक कर्जमाफीचे रखडलेले पंचनामे, जाचक अटी, पूरग्रस्तांचे पुनर्वसन, जिल्ह्यात कोलमडलेली आरोग्य सेवा, जुन्या पेन्शन योजनेसाठी आक्रमक झालेल्या शासकीय कर्मचारी संघटना या प्रश्‍नांवर महाजनादेश यात्रेत योग्य उत्तरे दिली जावीत, ही अपेक्षा आहे .

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)