पुणे : राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अवघ्या काही दिवसांवर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. राज्यातील सगळेच पक्ष आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आपण केलेल्या कामांचा जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये मोठ्या बहुमतासह भारतीय जनता पक्ष सत्तेत आला. पक्षाने यंदा सलग तिसऱ्यांदा केंद्रामध्ये सत्ता स्थापन केली आहे.
या काळात पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इतर पक्षातील नेत्यांचे इनकमिंग सुरू आहे. मात्र मागील काही काळापासून बाहेरून आलेल्यांमुळे पक्षाच्या मुळच्या कार्यकर्त्यांची गळचेपी होत असल्याचा आरोप भाजपवर होतोय. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर उभारणाऱ्या मयूर मुंडे या कार्यकर्त्याने पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
मोदींचे बांधले होते मंदिर
मुयुर मुंडे यांनी 2021 मध्ये औंधमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधले होते. ते म्हणाले की, मी अनेक वर्षांपासून पक्षासाठी निष्ठेने काम करत आहे. मी विविध पदांवर प्रामाणिकपणे काम केले आहे. मात्र भाजप आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत आहे. इतर पक्षातून येणाऱ्यांना पक्ष महत्त्व देत असल्याचा आरोप करत त्यांनी पक्षाला रामराम केला आहे.
मोदींना पाठवला राजीनामा
मी पीएम मोदींचा कट्टर समर्थक आहे आणि त्यांच्यासाठी काम केले आहे पण आमच्यासारख्या लोकांना पक्षात स्थान नाही म्हणून मी पक्ष सोडत आहे असे म्हणत त्यांनी आपल्या राजीनाम्याची प्रत पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय, राज्य आणि शहर भाजप प्रमुखांना पाठवली आहे.