बावडा – बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन इंदापूर कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले होते. यानुसार भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या धनश्री युवराज बोडके यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज पक्षाच्या आदेशानुसार मागे घेण्याचे मान्य केले आहे.भारतीय जनता पक्षानेही अंकिता पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
बावडा-लाखेवाडी जि.प.गटाच्या पोटनिवडणुकीमध्ये कॉंग्रेसच्या उमेदवार अंकिता हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे, त्यामुळे भाजप येथे उमेदवार उभा करणार नाही, अशी माहिती भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे व भाजपा ज्येष्ठ नेते मारूती वणवे यांनी दिली. यासंदर्भात प्रसिद्धीपत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे. भाजप प्रदेश व पुणे जिल्हा कार्यकारिणीकडून जिल्हाध्यक्ष आमदार बाळासाहेब भेगडे यांनी बावडा-लाखेवाडी गटाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार उभा करू नये, असा आदेश दिलेला आहे. त्यानुसार भाजप आपला उमेदवार देणार नाही.
विद्यमान सदस्यांचे निधन झाले तर येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीकरीता इतर राजकीय पक्ष हे आपला उमेदवार उभा न करता पाठिंबा देतात, असा राजकारणातील अलिखित नियम आहे. रत्नप्रभादेवी पाटील या आपल्या सर्वांच्याच मातेसमान असल्याने त्यांच्या निधनामुळे होणाऱ्या पोटनिवडणुकीत त्यांचीच नात असलेल्या अंकिता यांच्या विरोधात उमेदवार उभा करणे उचित होणार नाही, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे.
भाजपकडून धनश्री युवराज बोडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षाच्या आदेशानुसार बोडके यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचे मान्य केले आहे, असे नानासाहेब शेंडे व भाजपचे ज्येष्ठ नेते मारूती वणवे यांनी स्पष्ट केले. या प्रसिद्धीपत्रकावर भाजपच्या माऊली चवरे, रामचंद्र निंबाळकर, तानाजी थोरात, युवराज म्हस्के, बाळासाहेब पानसरे, डॉ. निलेश शिंगाडे, अशोक वणवे, युवराज बोडके, आण्णासो पाटील आदी इंदापूर तालुक्यात पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.