‘भाजप देशभरात उभारणार ७६८ कार्यालये’; जे.पी.नड्डा यांची माहिती

पणजी – भाजप देशभरात पक्षाची ७६८ कार्यालये उभारणार आहे. त्यातील ५६३ कार्यालये सज्ज झाली आहेत. तर, ९६ कार्यालयांचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी दिली.
भाजपच्या गोव्यातील प्रदेश मुख्यालयाच्या नव्या इमारतीचा कोनशिला अनावरण समारंभ त्या राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला.
त्यावेळी नड्डा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाषण केले. केंद्रात भाजप सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अतिशय महत्वाचे सरकारी निर्णय घेतले.
त्यांनी पक्ष संघटनेशी निगडीत असणारेही महत्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये प्रत्येक राज्याच्या राजधानीत पक्षाचे प्रदेश मुख्यालय आणि प्रत्येक जिल्ह्यात पक्ष कार्यालयाची उभारणी याचाही समावेश आहे, असे ते म्हणाले.
गोव्यात जून २०१३ मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यामध्ये केंद्रातील कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सरकारला सत्तेवरून दूर करण्याचा निर्धार करण्यात आला.
त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत केली. परिणामस्वरूप २०१४ यावर्षी केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले, असेही नड्डा यांनी नमूद केले.




