रेडा (प्रतिनिधी) – विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या जागांमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना भारतीय जनता पक्ष संधी देऊन बारामतीच्या पवारांच्या हक्काच्या लोकसभा मतदारसंघात आपले दमदार अस्तित्व निर्माण करणार की नाही. यावर उलट- सुलट चर्चांना तालुक्यात ऊत आला आहे. जर हर्षवर्धन पाटलांना विधानपरिषदेवर संधी दिली गेली नाही तर बारामती लोकसभा मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीला नुसती शोधाशोध करावी लागेल अशीही चर्चा रंगली आहे.
माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कॉंग्रेसच्या पहिल्या फळीतील बाक सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये केंद्रात असणारी भाजपची सत्ता व राज्यात असणारे भाजपची सत्ता कारणीभूत होती. मात्र विधानसभेचा निकाल हाती आल्यानंतर संख्याबळ असतानादेखील भाजपला मुख्यमंत्रिपदाची खुर्ची टिकवता आली नाही. त्यामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस मधून गेलेले मातब्बर नेते भाजपमध्ये एकाकी पडले. तसे पाहिले तर पश्चिम महाराष्ट्रात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सहकार चळवळीतील वरिष्ठ नेते आहेत. भाजपने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना शब्द देऊन देखील, कोणतीही वरिष्ठ जबाबदारी हर्षवर्धन पाटलांवर अध्याप दिलेली नाही. जरी इंदापूर पंचायत समिती व दोन साखर कारखाने हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असले, तरी देखील ग्राउंड पातळीवरील चित्र राष्ट्रवादी कॉंग्रेसमय झाले आहे. बारामती, दौंड, इंदापूर या परिसरात हर्षवर्धन पाटील यांचा दांडगा कामाचा संपर्क असल्यामुळे भाजपला आगामी काळात या तीन तालुक्यांमध्ये चांगले दिवस येणार आहेत. मात्र विधानपरिषदेचे आमदारकीची जागा हर्षवर्धन पाटील यांना देण्यात यावी, अशी मागणी हर्षवर्धन पाटील समर्थकांनी लावून धरलेली दिसत आहे.
हा निर्णय भाजपला लाभदायक ठरणार –
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांना विधान परिषदेवर संधी दिली पाहिजे, असे कार्यकर्त्यांचे ठाम मत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा स्नेह जवळचा असल्याने, तसेच मंत्री म्हणून पंधरा वीस वर्ष कामकाज अत्यंत सोप्या पद्धतीने पार पाडून नावलौकिक हर्षवर्धन पाटील यांनी मिळवला आहे. या सर्व गोष्टींचा फायदा भारतीय जनता पक्षाला निश्चित मिळणार असून बारामती लोकसभा मतदारसंघात चांगले दिवस येण्यासाठी विधानपरिषद हर्षवर्धन पाटलांना हा निर्णय भाजपला लाभदायक ठरणार हे मात्र निश्चित.