कोरेगाव, (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना विकासाच्या प्रवाहात आणून राष्ट्राचा उध्दार करायचा आहे, तेच धोरण अवलंबून आपण भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकांना विकासाच्या प्रवाहात आणत आहोत. मोर्चाच्या सर्वच पदाधिकार्यांना निश्चितपणे ताकद दिली जाईल, अशी ग्वाही कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे यांनी दिली.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या नवनियुक्त पदाधिकार्यांना मंगळवारी दत्तनगर येथील संपर्क कार्यालयात नियुक्तीपत्रे ना. महेश शिंदे यांच्या हस्ते आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, शहराध्यक्ष दीपक फाळके व तालुका सोशल मिडिया संयोजक वैभव बर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आली. त्यावेळी पदाधिकार्यांना शुभेच्छा देताना ते बोलत होते.
शहर उपाध्यक्ष म्हणून सुमित देंडे, सरचिटणीस म्हणून सुमित बर्गे व अमोल बर्गे यांना तर सोशल मिडिया संयोजक म्हणून नितीन कदम यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी सरचिटणीस तानाजी माने, उपाध्यक्ष अनिकेत घनवट, गौरव खवळे, नीलेश बोतालजी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
नूतन पदाधिकार्यांचे भाजप नेत्या डॉ. सौ. प्रियाताई महेश शिंदे, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, भाजप कोरेगाव विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख भरत मुळे, मंडल अध्यक्ष संतोष जाधव, तालुकाध्यक्ष नीलेश यादव यांच्यासह आ. महेशदादा शिंदे साहेब विचार मंच आणि कोरेगाव विकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकार्यांनी अभिनंदन केले.