भाजपला निर्विवाद बहुमत मिळेल- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – लोकसभेच्या निवडणूकीमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळवून पुन्हा सत्तेत येईल. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 300 पेक्षा अधिक जागांसह मोठा विजय मिळेल, याचा लोकांनीही निश्‍चय केला आहे,
असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधानांनी जनभावना भाजपसाठी अनुकूल असल्याने सक्षम प्रतिस्पर्धी शोधलाही जात नसल्याचे सांगितले.

विरोधकांच्या एकात्मतेचे प्रमाण 2014 पेक्षा अधिक असल्याचा दावाही पंतप्रधानांनी फेटाळून लावला. उलट 2014 पेक्षा सध्या विरोधक अधिक विस्कळीत आहेत. यावेळी आंध्रप्रदेश आणि पश्‍चिम बंगालमध्ये कोणताही समझोता झालेला नाही. केरळ आणि ओडिशामध्ये कम्युनिस्ट पक्षांसोबतही कोणतेही सामंजस्य निश्‍चित झालेले नाही, हे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले. विरोधक आताच एकमेकांना खाली खेचत आहेत. त्यामुळे निवडणूकीनंतर विरोधकांमध्ये हातमिळवणी केली जाण्याची शक्‍यताही नसल्याचे त्यांनी सांगितले.

मोदी विरुद्ध कोण? असा प्रश्‍न सध्या तरी उपस्थित होत नाही. हा प्रश्‍न कदाचित 2024 साली उपस्थित केला जाऊ शकतो. “टीआरपी” वाढवण्यासाठी टिव्हीवरच्या चर्चेत असा प्रश्‍न उपस्थित केला जाऊ शकतो. मात्र 2019 साली हा प्रश्‍न उपस्थितच होत नाही, असे पंतप्रधानांनी सांगितले.बेरोजगारीच्या मुद्दयावर सरकारवर टीका होत आहे. मात्र असा आरोप अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारवरही केला जात होता. मात्र नंतर मिळालेल्या आकडेवारीनुसार वाजपेयी सरकारच्या काळात 6 कोटी रोजगार निर्माण झाल्याचे सिद्ध झाले. तर “युपीए’सरकारच्या काळात केवळ 1.5 कोटी रोजगार निर्माण झाले होते. तरीही वाजपेयी सरकारची प्रतिमा मलिन केली जात होती. आपल्या सरकारच्या काळात मुद्रा बॅंकेच्या माध्यमातून 4 कोटी जणांनी उद्योगांसाठीचे अर्थसहाय्य घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.

देशात पूर्वीच्या सरकारपेक्षा अधिक रस्ते बांधले जात आहेत. रेल्वेचा दुप्पट वेगाने वाढते आहे. त्यासाठी मनुष्यबळ लागत नाही का? भारतात सौर उर्जेसाठी राबवले जात असलेले मोठे अभियान मोठ्या गुंतवणूकीमुळेच शक्‍य होते आहे. ही गुंतवणूक करणारे लोक रोजगार निर्मिती होत असल्यानेच गुंतवणूक करत आहेत. बेरोजगारी असती तर मोठी गुंतवणूकच झाली नसती, असे पंतप्रधान म्हणाले.


उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी निवडणूकीपूर्वीच कशी ?

उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यासाठी अवकाशात कोणतेही अडथळे नसण्याची वेळ हवी होती. धाडस अथवा पुढाकार हे अचानक केले जात नाही. त्यासाठी संबंधित जागतिक समुदायांना तशी पूर्वकल्पना द्यावी लागते. ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यासाठी अनेक देशांबरोबर समन्वय ठेवावा लागतो. त्यांच्या उपग्रहांच्या कक्षा आणि मार्गक्रमण करण्याच्या वेळा लक्षात घेऊनच चाचणीसाठीचे नियोजन करावे लागते. त्यामुळे ही चाचणी आणि निवडणूक यांचा काहीही संबंध मानला जाऊ नये, असे पंतप्रधान म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.