मुंबई : कॉंग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेवरील पोटनिवडणुकीसाठी अमरिश पटेल आता भाजपच्या तिकीटावर मैदानात उतरले आहेत.
राज्यसभा उमेदवारांच्या दुसऱ्या यादीसह भाजपने धुळे नंदुरबार मतदारसंघातून अमरिश पटेल यांना उमेदवारी जाहीर केली. धुळे नंदुरबार विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मार्चच्या पहिल्या आठवडयात पोटनिवडणूक जाहीर केली होती.
कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपचा झेंडा हाती धरताना अमरिश पटेल यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. या जागेसाठी 30 मार्चला मतदान प्रक्रिया पार पडणार असून दुसऱ्याच दिवशी म्हणजे 31 मार्चला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे धुळे विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठीही शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांची एकजूट होण्याची चिन्हं आहेत. महाविकास आघाडी तर्फे कॉंग्रेसचे अभिषेक पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
त्यामुळे अमरिश पटेलांना आपली जागा टिकवता येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, अमरिश पटेल हे धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून आले होते.
कॉंग्रेसच्या तिकीटावर ते सलग दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आले होते. परंतु विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पटेल यांनी कॉंग्रेसचा हात सोडून भाजपची वाट धरली होती.