शेवगाव – आपल सौभाग्य हेच महिलाच सर्वस्व असतं. ते हरपलं तर ती कोलमडते. हा प्रसंग दुर्दैवाने मोनिकाताई राजळे यांच्यावर गुदरला. मात्र त्या रडत न बसता लढल्या, ते तुमच्या बळावर. त्यांनाही नावं ठेवली गेली, याबद्दल तीव्र खेद व्यक्त करून नामदार पंकजाताई तुमच्या पाठीशी आहेत. मीही तिकडून इकडे आले आहे.
मला खात्री आहे, येथे पुन्हा भाजपाचाच झेंडा फडकणार आहे, असा ठाम विश्वास भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी येथे व्यक्त केला.
भाजपा-शिवसेना, रिपाई (आठवले गट), रासप, शिवसंग्राम महायुतीच्या उमेदवार मोनिकाताई राजळे यांच्या प्रचाराचा नारळ घोटण येथील मल्लिकार्जुनेश्वर महादेवाची पूजा करून वाढविण्यात आला. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
वाघ म्हणाल्या, निवडणुका या विकासाच्या मुद्द्यावर व्हायला हव्यात. मोनिकाताईंना महाराष्ट्राच्या राजकारणात नवनिर्माण करण्याची संधी मिळाली. महिलांना संधी मिळाली तर त्या काय करू शकतात, हे आमदार मोनिकाताईकडे पाहून समजते. राजकारण सोपे नाही जबाबदारीने तावून-सुलाखून निघावं लागतं. आपणास कर्तुत्ववान आमदार लाभल्या.
आमदार मोनिकाताई राजळे भावूक होऊन म्हणाल्या, माझ्यावर आमदार निष्क्रिय आहेत असा आरोप गेल्या साडेचार वर्षात झाला नाही. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय दिला.
तब्बल अकराशे कोटीची कामे केली. या कामात एकही काम खोटे नाही. म्हणूनच लोकसभेच्या निकालात मताधिक्य वाढले. नेतृत्वानेही विश्वास ठेवला. मात्र निवडणुका तोंडावर आल्या तेव्हा तथाकथित निष्ठावंतांनी वैयक्तिक मुला बाळाबद्दल, कुटुंबाबद्दल अश्लाघ्य भाषा वापरली. जातीपातीचे आरोप केले. त्यांना त्याचे उत्तर जनता देईलच. असे व्यक्तिगत द्वेशाचे राजकारण या अगोदर कधी झाले नाही.
याचे स्मरण करून देत उद्याची निवडणूक माझी एकटीची नाही, आपल्या सर्वांची आहे. नामदार पंकजाताई व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही एवढा शब्द देते. आगामी दहा दिवस माझ्यासाठी द्या. म्हणजे माझी पुढील पाच वर्षे तुमच्यासाठीच असतील असे आवाहन त्यांनी केले. बापूसाहेब भोसले, बापूसाहेब पाटेकर, बळीराम लेंडाळ, ओबीसी सेलचे तुषार वैद्य, पांडुरंग खेडकर, शिवसेनेचे भारत लोहकरे, शेतकरी संघटनेचे ताराभाऊ लोढे, दिनेश लव्हाट आदींची भाषणे झाली. संजय टाकळकर यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.
निर्धार शिवसैनिकांचा
याचवेळी शेवगावात शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख नंदकुमार मोरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, शेवगाव तालुका प्रमुख ऍड. अविनाश मगरे, युवासेनेचे शितल पूरनाळे, भारत लोहकरे, एकनाथ कुसळकर, सिद्धार्थ काटे आदींच्या उपस्थितीत तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व शाखा प्रमुख, उपप्रमुख ,युवा सेनाप्रमुख यांचा मेळावा झाला. त्यात सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार युतीच्या उमेदवार मोनिकाताई राजळे यांच्या विजयासाठी शिवसैनिक पुढे राहील असा निर्धार व्यक्त करण्यात आला.