गांधी कुटूंबातील तीन सदस्यांवर साधला निशाणा
धनबाद – भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी राजकारणात सक्रिय असलेल्या कॉंग्रेसच्या गांधी कुटूंबातील तीन सदस्यांवर निशाणा साधला. भाजपचा मुकाबला कॉंग्रेसच्या 3जीशी आहे. कॉंग्रेससाठी 3जी म्हणजे सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी. तर भाजपसाठी 3जी म्हणजे गावे, गोमाता आणि गंगा, असे ते म्हणाले.
झारखंडमधील प्रचार सभांमध्ये बोलताना शहा यांनी विरोधकांवर आणि विशेषत: कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवली. मतपेढीच्या राजकारणासाठी विरोधक देशाची सुरक्षाही धोक्यात घालत आहेत. निवडणुका येतील आणि जातील. आमच्यासाठी देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. दहशतवाद्यांनी झाडलेल्या बंदुकांच्या गोळ्यांना बॉम्बने प्रत्युत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले.
मागील वीस वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही सुटी घेतली नाही. त्याउलट, राहुल वारंवार प्रदीर्घ सुट्यांवर जातात. त्यांच्या ठावठिकाण्याबद्दल त्यांच्या आईलाही काळजी वाटते, अशी खिल्ली शहा यांनी उडवली. वेगवेगळी संस्कृती असणाऱ्या देशातील सर्वच राज्यांना मी प्रचारासाठी भेटी दिल्या. मला प्रत्येक ठिकाणी एकच समान बाब आढळली आणि ती म्हणजे मोदींच्या समर्थनार्थ जनता देत असलेली नारा, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.