भाजपच्या धोरणामुळेच भाजप पराभूत होईल

सपा-बसपाच्या पहिल्याच सभेत मायावतींची कॉंग्रेसवरही टीका

देवबंद (सहारणपूर, उत्तर प्रदेश) – समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या पहिल्याच सभेमध्ये बसपा नेत्या मायावती यांनी भाजपा आणि कॉंग्रेस दोन्ही पक्षांवर शरसंधान साधले. द्वेषभावनांनी प्रेरित असल्याने, विशेषतः “चौकीदार’ उपक्रमामुळे भाजपचा पराभव होईल. इतकी वर्षे राज्य करूनही कॉंग्रेस अपयशी ठरली आहे. कारण कॉंग्रेसने केवळ फुटीचे राजकारण केले, असे मायावती म्हणाल्या. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख अजित सिंह यांच्या उपस्थितीत त्या बोलत होत्या.

“आमच्या सरकारकडून किमान उत्पन्न सहाय्य देण्याऐवजी गरिबांना रोजगार दिला जाईल. इंदिरा गांधींनीही गरिबी हटवण्यासाठी 20 कलमी कार्यक्रम दिला होता. पण त्याचा काही परिणाम झाला का ? आमचा पक्ष अन्य पक्षांप्रमाणे गाजावाजा न करता शांतपणे काम करतो. कॉंग्रेसकडूनही मोठी आश्‍वासने दिली जातात. मात्र कॉंग्रेसला आतापर्यंत कमी वेळ संधी दिली गेली का ? कित्येक राज्यांमधून कॉंग्रेसचे उच्चाटनच झाले. गरिबी हटवण्यासाठी “न्याय’ योजना काही स्थायी उपाय योजना नाही, असे मायावती म्हणाल्या.

भाजपकडून तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातो. त्याचा मागास वर्गीयांनाही त्रास होतो. या पक्षांच्या विभाजनवादी विचारांमुळे समाज दुखावला जातो आहे. केंद्रात किंवा राज्यातही आरक्षणाच्या मुद्दयाकडे दुर्लक्ष होते. मागासवर्गीयांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही. उलट त्यांचे शोषणच होते आहे. अल्पसंख्यांकांनाही त्याचा त्रास होतो आहे, असे मायावती म्हणाल्या.

मायावतींनी भ्रष्टाचाराच्या मुद्दयावरूनही कॉंग्रेससह भाजपवर टीका केली. बोफोर्समुळे कॉंग्रेस बदनाम झाली. तर भाजप राफेलमुळे बदनाम होत आहे. भाजपकडून विरोधकांविरोधात सीबीआय, ईडी सारख्या तपाससंस्थांचा गैरवापर केला जात आहे. आता भाजपला आणखी संधी देता कामा नये, असे आवाहन मायावतींनी मतदारांन केले.
उत्तर प्रदेशत ऊस शेतकरी अडचणीत आहे. त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. भाजपची निवडणूकीतील आश्‍वासनांची पूर्तता अजूनही झालेली नाही. भाजपकडून घोषणांची हवा केली जात आहे. या घोषणाबाजीसाठी करदात्यांचे हजारो कोटी रुपये खर्च झाले. हे पैसे गरिबांसाठी वापरता येऊ शकले असते, असेही मायावती म्हणाल्या.

 


यंदाच्या निवडणूकीत “महापरिवर्तन’- अखिलेश यादव
भाजपचे केंद्रातील सरकार ब्रिटीशांपेक्षाही अधिक फुटीचे राजकारण करत आहे, अशी टीका सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी चहावाला बनून आले आणि ते “अच्छे दिन’ आणतील, असे आम्हालाही वाटले होते. पण आता निवडणूक आल्यावर आपण “चौकीदार’ असल्याचे ते म्हणायला लागले आहेत. आता आम्ही सगळे मिळून प्रत्येक चौकीदाराकडून “चौकी’ हिसकावून घेतली जाईल, असे अखिलेश यादव म्हणाले. समाजवादी, राष्ट्रीय लोकदल आणि बहुजन समाज पार्टीची अद्याक्षरे घेऊन पंतप्रधानांनी”शराब’अशी संभावना केली होती. मात्र अशी संभावना करणाऱ्यांना सत्तेची नशा चढली आहे, अशी टीकाही अखिलेश यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.