बारामती – बारामती विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरी येथील जागा लढविण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने केली आहे. या जागेसाठी शिवसेनेबरोबर बोलणी करणार असल्याचे भाजप सूत्रांकडून सांगण्यात आले. यामुळेच भाजपचे संपर्क कार्यालय शहरात सुरू करण्यात आले असून बारामतीसह इंदापूर आणि दौंड राजकारणाची पक्षीय सूत्रेही येथून हलविली जाणार आहेत.
भाजपकडून बारामतीबाबत नेहमीच आव्हानं दिली गेली आहेत. केंद्रात मोदी पर्व सुरू झाल्यापासून राज्यातही याचे वारे घोंगावू लागल्याचे 2014 मध्येच लक्षात आले होते. रासपच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने घड्याळावर निशाणा साधन लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्यापुढे आव्हान निर्माण केले होते. तर, यावेळी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुळे यांच्या विरोधात भाजपचे केंद्रीय, राज्यस्तरीय नेते बारामती मतदारसंघावर लक्ष ठेवून होते.
हीच स्थिती विधानसभेतही कायम ठेवण्याबाबत भाजपचे प्रयत्न असणार आहेत. यातूनच शहरात पक्षाचे हक्काचे कार्यालय असावे, या विचारातून बारामतीत भाजपचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. बारामती विधानसभेची जागा शिवसेनेकडे आहे. मात्र, भाजप ही जागा लढण्यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे या जागेबाबत शिवसेनेशी बोलणी सुरू आहे. युतीतील जागावाटपावर येत्या काही दिवसांत निर्णय होणार आहे.
घराणेशाही, भ्रष्टाचार आणि विकासाच्या मुद्द्यावर बारामती विधानसभा निवडणूक लढविली जाणार आहे. बारामती मतदारसंघात धनगर समाजाचे मोठे मतदान आहे. यामुळे यावरही लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. आरक्षण मुद्द्यावर धनगर समाज राष्ट्रवादी कॉंग्रेसवर नाराज आहे. केंद्रात आणि राज्यात युतीचे सरकार असल्याने या प्रश्नावर निर्णय होईल, अशी आशा समाजाला असल्याने भाजपकडून ही संधी साधण्याचा प्रयत्न होत आहे. याच करणातून बारामती विधानसभेची जागा लढविण्यास भाजप प्रयत्न करीत असल्याचे सांगितले जात आहे.