कोलकता : पश्चिम बंगालमध्ये 2026 यावर्षी विधानसभा निवडणूक होईल. त्या निवडणुकीनंतर भाजपची सत्ता येईल, असे भाकीत ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी रविवारी केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बंगालमधील भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेचा प्रारंभ झाला. त्या सोहळ्यात मिथुनदा बोलत होते.
बंगालमध्ये भाजपच्या सत्तेचे लक्ष्य गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. लोकसभा निवडणुकीवेळी मी 37 दिवस भाजपचा प्रचार केला. मात्र, त्या निवडणुकीत भाजपचे संख्याबळ घटल्याची खंत वाटते, अशी भावनाही राज्यसभेचे माजी खासदार असणाऱ्या मिथुनदांनी व्यक्त केली. बंगालमध्ये मागील काही वर्षांत भाजपची राजकीय ताकद वाढली आहे. त्यातून तो पक्ष त्या राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयास आला आहे.
बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 42 जागा आहेत. मागील वेळी (वर्ष 2019) भाजपने त्यातील 18 जागा जिंकल्या होत्या. ती कामगिरी आणखी उंचावण्याचा चंग भाजपने बांधला. मात्र, यावेळी त्या पक्षाला 12 जागांवरच समाधान मानावे लागले. म्हणजेच, मागील वेळेच्या तुलनेत भाजपने अर्धा डझन जागा गमावल्या.