हिंदुत्वावरून सेना भाजपला कोंडीत पकडेल?

राहुल गोखले

सन 1992 मध्ये कारसेवकांनी बाबरी पाडली, तेव्हा भाजपने “हे कृत्य आपल्या कार्यकर्त्यांचे नव्हे,’ अशी पडती भूमिका घेतली. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र, “हे कृत्य आपल्या शिवसैनिकांनी केले’ अशी बिनधास्त उघड भूमिका घेतली होती. राममंदिराचा मुद्दा त्यावेळीच भाजपच्या हातातून निसटला होता.

भाजपची शक्‍य तेवढी कोंडी करण्याच्या प्रयत्नांत कोणतीही कसर बाकी ठेवायची नाही या ईर्ष्येनेच सध्या शिवसेना डावपेच आखत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनात शिवसेनेने महाराष्ट्रातील आपल्याच सरकारविरोधात शड्डू ठोकला होता आणि मराठा आंदोलन उग्र होत असताना तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्रीबदलाच्या वावड्या उठवून दिल्या होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकसभेत मोदी सरकारविरोधात मांडलेल्या अविश्‍वासदर्शक ठरावात शिवसेनेने सोयीस्करपणे अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आणि संसदेच्या बाहेर मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे “सावज दमले असल्याचा’ दावा करतात. एकूण शिवसेना नक्की कोणती भूमिका घ्यायची याविषयी संभ्रमात दिसते आणि त्यामुळे सत्तेतून बाहेर पडायचे नाही आणि सरकारवर टीकाही करत राहायची अशा दुटप्पी वर्तनाच्या गर्तेत शिवसेना अडकली आहे. आता शिवसेनेने भाजपला हिंदुत्वाच्या मुद्यावर कोंडीत पकडण्याचे ठरविले आहे आणि पक्षप्रमुख अयोध्या आणि वाराणसीला भेट देणार असल्याचे फलक मुंबईत झळकले आहेत. त्याचा अन्वयार्थ शोधणे गरजेचे आहे.

राममंदिर मुद्द्याच्या दृष्टीने अयोध्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ म्हणून वाराणसी यांची निवड उद्धव ठाकरे यांनी केली आहे, हे उघडच आहे. दोन्ही ठिकाणी भेट देऊन भाजपवर शरसंधान करण्याची संधी साधायची आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडायचे, अशी ठाकरे यांची रणनीती आहे. अर्थात त्यामुळे भाजप शिवसेनेच्या अशा आरोपांतून मुक्‍त होऊ शकत नाही. कारण भाजपच्या या स्थितीस खुद्द भाजपच जबाबदार आहे. सन 1990 च्या दशकात अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी भाजपने तत्कालीन पक्षाध्यक्ष लालकृष्ण आडवाणी यांच्या नेतृत्वाखाली रथयात्रा काढली होती. विश्व हिंदू परिषद देखील त्या आंदोलनात आघाडीवर होती.

सन 1992 मध्ये कारसेवकांनी बाबरी पाडली, तेव्हा भाजपने “हे कृत्य आपल्या कार्यकर्त्यांचे नव्हे,’ अशी पडती भूमिका घेतली. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र, “हे कृत्य आपल्या शिवसैनिकांनी केले’ अशी बिनधास्त उघड भूमिका घेतली होती. वास्तविक राममंदिराचा मुद्दा त्यावेळीच भाजपच्या हातातून निसटला होता, असे म्हटले पाहिजे. त्या घटनेला आता पाव शतक उलटून गेल्यावरही अयोध्येत राममंदिर उभे राहू शकलेले नाही. या काळात शरयूच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. सुरुवातीला भाजप “आपल्याला लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळाले तर राममंदिराची उभारणी करण्यात येईल,’ असा दावा करीत असे. “हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करणे श्रेयस्कर,’ अशीही भूमिका भाजप घेत असे.

दरम्यानच्या काळात गुजरातेत गोध्रा येथे उसळलेल्या दंगलीत अनेकांचे प्राण गेले; पण गुजरातला हिंदुत्वाची प्रयोगशाळा मानले जाऊ लागले आणि आडवाणींचे स्थान हळूहळू मोदी घेऊ लागले. मधली दहा वर्षे केंद्रात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत होते आणि अशा वेळी भाजपला राममंदिर न उभारण्यासाठी आयतीच सबब मिळाली होती. परंतु सन 2014 च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले आणि हिंदुत्ववादाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या.

तथापि प्रचंड बहुमताने सत्तेत आल्याला आता चार वर्षे उलटून गेल्यावरही राममंदिराचा मुद्दा आहे तेथेच आहे आणि “सन 2019 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी राममंदिराची उभारणी सुरू होईल,’ अशी वृत्ते अधूनमधून पसरवली जातात; कालांतराने त्यावर खुलासे देण्यात येतात. वास्तविक केंद्रात भाजपला बहुमत, उत्तर प्रदेशात भाजपचे स्वबळावरील सरकार असतानादेखील राममंदिराचे आश्‍वासन भाजपला पूर्ण करता आलेले नाही. शिवसेना नेमकी भाजपच्या याच अगतिकतेकडे अंगुलीनिर्देश करून त्या पक्षावर तोंडसुख घेत, राजकीय कुरघोडी करू पाहात आहे.

ज्या विश्‍व हिंदू परिषदेने राममंदिर आंदोलनात मोठा वाटा उचलला होता, त्याच परिषदेच्या प्रवीण तोगडिया यांचेदेखील मोदींशी मतभेद झाले आणि तोगडिया यांना विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वापासून वंचित राहावे लागले. तेंव्हा “भाजपचे हिंदुत्व बेगडी आणि निवडणुकांपुरते आहे,’ हे अधोरेखित करण्यासाठीच उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार, यात शंका नाही. जम्मू-काश्‍मीरमध्ये थेट पीडीपीशी सत्ताभागीदारी करण्यात धन्यता मानणाऱ्या भाजपने 370 वे कलम रद्द करणे, समान नागरी कायदा लागू करणे आणि राममंदिराची उभारणी करणे, हे नेहमीच आपले खास मुद्दे मानले होते आणि अन्य पक्षांपेक्षा याच बाबतीत भाजपचे वेगळेपण होते.

परंतु “ज्या मोदींना हिंदुत्ववाद्यांनी आपल्या गळ्यातील ताईत बनविले होते त्याच मोदींनी सर्व बाबी अनुकूल असूनही हिंदुत्ववाद्यांचा भ्रमनिरास केला आहे’, असा प्रचार शिवसेनेने केला तर आश्‍चर्य वाटावयास नको. ठाकरे यांच्या प्रस्तावित अयोध्या दौऱ्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. “भाजपला केवळ मतांच्या ध्रुवीकरणासाठी राममंदिराचा मुद्दा हवा असतो; पण प्रत्यक्षात राममंदिराच्या उभारणीविषयी भाजप बिलकुल गंभीर नाही,’ हा संदेशही शिवसेनेला भाजपच्या मतदारांमध्ये पोचवायचा असावा.

एकीकडे हिंदुत्वाविषयी उदासीनता आणि दुसरीकडे ज्या विकासावर मोदी सतत बोलतात, त्या विकासाचा थेट वाराणसीत झालेला खेळखंडोबा याकडे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघाचा देखील दौरा करणार आहेत. एकूण “भाजपने ना हिंदुत्वासाठी काही केले ना विकास साधला,’ या विषयी निदान त्यानिमित्ताने चर्चा तरी व्हावी अशी शिवसेनेची अपेक्षा असावी. यामुळे शिवसेनेला सहानुभूती मिळण्यापेक्षा भाजपच्या नाकर्तेपणावर चर्चा घडवून आणण्यातच ठाकरे यांना रस असावा. आपल्या प्रस्तावित दौऱ्यांमधून तेवढे साधले जावे एवढीच त्यांची किमान अपेक्षा असावी. तथापि भाजपच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांचे दौरे नवी डोकेदुखी ठरतील यात शंका नाही. तेवढे झाले आणि भाजपला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला, तरी शिवसेनेला आपला हेतू सफल झाल्याचे समाधान मिळू शकेल!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)