वडगाव शेरी – वडगावशेरी मतदार संघामध्ये आमदार जगदीश मुळीक यांनी गेल्या पाच वर्षांत विविध विकासकामे केली आहेत. आमदार मुळीक, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची टीम चांगली आहे. मतदार संघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक जण भाजपमध्ये प्रवेश घेत आहेत. येथे भाजपसाठी वातावरण चांगले आहे. आमदार जगदीश मुळीक निश्चित विजयी होणार, असा विश्वास भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी रविवारी व्यक्त केला.
वडगावशेरी मतदार संघातील भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप आणि शिवसंग्राम या महायुतीचे उमेदवार जगदीश मुळीक यांनी रविवारी आनंद पार्क, भैरवनगर, मुंजाबावस्ती, धानोरी गावठाण, कवलड मशिद गल्ली, कलवड जकात नाका भागांमध्ये पदयात्रा काढली. यात खासदार संजय काकडे सहभागी झाले होते.
यावेळी काकडे यांनी मतदारांशी संपर्क साधला. उपमहापौर सिद्धार्थ धेंडे,नगरसेवक अनिल टिंगरे, योगेश मुळीक, नाना सांगडे, राहुल भंडारे, नगरसेविका ऐश्वर्या जाधव, आबा खलसे, चंद्रकांत टिंगरे, आनंद गोयल, अशोक कांबळे, सचिन खांदवे, विशाल टिंगरे, किरण भालेराव, धनंजय जाधव उपस्थित होते.
काकडे म्हणाले, वडगावशेरी मतदार संघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मतदार संघामध्ये आमदार, भाजपचे 14 नगरसेवक आणि शिवसेनेचे तीन नगरसेवक आहेत. भाजप महायुतीची जबरदस्त ताकद या मतदारसंघात आहे. तसेच नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. यामुळे आमदार मुळीक जवळपास एक लाखापेक्षा जास्त मताधिक्क्याने जिंकतील हे निश्चित आहे, असा विश्वासही काकडे यांनी व्यक्त केला.