राहुरी -राहुरीत भाजपला आज खिंडार पडले असून पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते पक्षप्रवेश सोहळा झाला. त्या प्रवेशामुळे आता भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू झाली असून तेही लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करतील, असे सांगण्यात आले आहे. आजचा तालुकाध्यक्ष प्रवेश ही त्या प्रवेशाचीच नांदी असल्याचे समजते. त्यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
भनगडे यांच्यासह उपसरपंच पोपटराव कोबरणे, गणेगाव सोसायटीचे अध्यक्ष बापू कोबरणे, माजी उपसरपंच गंगाधर कोबरणे, मंजाबापू कोबरणे, सोसायटीचे सदस्य भाऊसाहेब कोबरणे, बबनराव कोबरणे यांनी प्रवेश केला. यावेळी सुयोग नालकर, अनिल घाडगे, गंगाधर हारदे, बापू जगताप, पप्पू माळवदे, भारत भुजाडी, किरण गव्हाणे, संतोष आघाव, राजेंद्र बोरकर उपस्थित होते. या घडामोडींमुळे राहुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली असून भाजपला दिवसेंदिवस खिंडार पडत चालले आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी भाजप युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष व उपसरपंच दिपक वाबळे, वरशिंदे ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता.आता थेट तालुकाध्यक्षांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने तालुका भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.
आणखी कोण प्रवेश करणार याविषयी कुजबूज सुरू झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदार शिवाजी कर्डिले राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा झडत आहेत. त्यातच आता तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी प्रवेश केल्याने अनेकांच्या नजरा आता कर्डिले यांच्याकडे वळाल्या आहेत. कर्डिले यांचे कट्टर समर्थक राहुरीचे नगरसेवक शहाजी जाधव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता तालुकाध्यक्ष भनगडे यांनी प्रवेश केल्याने चर्चेला उधाण आले आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका विविध सहकारी सेवा संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.
त्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदार संघात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेशाचा धडाका उडविला असून विरोधकांच्या पोटात भीतीचा गोळा उठविला आहे. आगे आगे देखो होता है क्या, असे सूचक विधानही येऊ लागले असल्याने कोणत्या घडामोडी होतात. याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. मंत्री तनपुरे हे विकास कामे करताना कोणताही गट न पाहता विकासाला प्राधान्य देतात. त्यांच्या या भूमिकेमुळे विरोधकांमध्ये वेगळीच प्रतिमा निर्माण होत असून त्यांच्याबद्दल आकर्षण वाढत चालले आहे. त्यातूनच भाजपला रामराम करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.
कर्डिलेबरोबर भाजपचे नगरसेवकही राष्ट्रवादीच्या वाटेवर
अमोल भनगडे हे जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार असून जिल्हा परिषदेत यापुर्वी राष्ट्रवादीची सत्ता असल्याने व राजकीय गणित बांधुन भनगडेसह विश्वासु समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करुन आगामी जिल्हा परिषदसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारीचे आश्वासन मिळाले आहे. दरम्यान माजी आमदार कर्डिले राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा असून ते येत्या 8 किंवा 10 मार्चला राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यांच्याबरोबर भाजपचे काही नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते आहे.