मुंबई – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर राज्यभर त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला गेला. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील शिवरायांचा अपमान करणारी विधान करायला कोश्यारींना लाज वाटत नाही का? असा सवाल उपस्थित केला आहे. उदयनराजे भोसले आता भाजप पक्ष सोडणार असल्याची चर्चाही आता राजकीय वर्तुळात सुरु आहे. अशातच आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी या प्रकणावर प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांत बावनकुळे म्हणाले,’माझं असं म्हणणं आहे की,’उदयनराजेंची भूमिका आणि आमच्या सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही. पण राज्यपाल हे संविधानिक पद आहे. त्यांना परत घेणे किंवा ठेवणे हा आमचा अधिकार नाही. मी यापूर्वीच बोललो आहे, राज्यपालांनी महाराष्ट्रात अनेक वर्षे काम केलं, छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊनच काम केलं आहे. त्या दिवशी त्यांची चूक झाली आहे. खरंतर त्यांना परत बोलवणे किंवा ठेवणे हा अधिकार आपला नाही. तो खरंतर ज्यांचा अधिकार आहे ते निर्णय घेतील.’