पाणी वाचविण्यासाठी भाजपने पुढाकार घ्यावा : पवार

नगर  – ग्रामीण भागात झालेले जलसंवर्धनाचे काम आता शहरी भागात होणे गरजेचे आहे. नगर शहरात पाणी वाचविण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, यासाठी स्वत: मार्गदर्शन करेल. किती दिवस हे शहर चॉंदबिबीच्या मार्गाने चालेल; ते आता आपल्या मार्गाने चालेल याचा प्रयत्न करायला पाहिजे, असे मत पद्‌मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्‍त केले.

पवार यांना पद्‌मश्री पुरस्कार जाहीर झाला. याबद्दल शहर भाजपच्यावतीने शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे व महापौर बाबासाहेब वाकळे यांनी त्यांचा सत्कार केले. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते सुनिल रामदासी, श्रीकांत साठे, उपमहापौर मालन ढोणे, वसंत लोढा, पंकज जहागिरदार, वसंत राठोड, सतीश शिंदे, अनिल गट्टाणी, तुषार पोटे, महेश तवले, मनोज ताठे, गणेश साठे, लक्ष्मीकांत तिवारी, धनंजय जामगांवकर, भरत सुरतवाला आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पवार म्हणाले, सामाजिक कामांमुळे देशभर नाव झाल्याने अनेकदा राजकीय पक्षांच्या ऑफरही आल्या, मात्र त्या न स्वीकारता सामाजिक कार्याला प्राधान्य दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी व स्व.गोपीनाथ मुंडे यांनी ग्रामीण भागात केलेले काम व हिवरे बाजारचा केलेला विकास या धर्तीवर संसद आदर्श ग्राम योजना सुरु केली.

प्रास्तविकात गंधे म्हणाले, भारतात नव्हे तर जगात पवार यांनी नगर जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. पवार यांचे कार्य त्यांना मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळावा, असेच आहे. मात्र या आधीच्या सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेतली नाही. भविष्यातील पाणी नियोजनात पवार यांनी मार्गदर्शन करावे, आम्ही त्यांच्याबरोबर आहोत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.