भाजप पराभवासाठी आमच्यासोबत यावे

लक्ष्मण मानेंचे प्रकाश आंबेडकरांना आवाहन
कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे 50 जागांचा प्रस्ताव 

सातारा – लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला कोणताच फायदा झाला नाही. उलट ज्यांचा पराभव करायचा होता त्या भाजपच्या जागा वाढल्या. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आमच्यासोबत यावे, असे आवाहन पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत केले.

महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेस- राष्ट्रवादीकडे 50 जागांचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती त्यांनी दिली. आघाडीचे प्रवक्ते जयराज रजपूत, बाबुराव धोत्रे, भाऊसाहेब अडागळे, दगडूअण्णा सस्ते आदी यावेळी उपस्थित होते. माने म्हणाले, “”लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या मतांमुळे कॉंग्रेस- राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत आणि भाजपचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे आघाडीचा राजीनामा दिला व ऍड.प्रकाश आंबेडकर यांनादेखील राजीनामा देण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांनी राजीनामा न दिल्यामुळे आम्ही स्वतंत्र महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. आमच्यासोबत मुस्लिम लीगसह डावे पक्ष सोबत आले आहेत. खा.ओवेसी यांचीही भेट घेणार आहे.’

विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादीकडे दिलेल्या प्रस्तावात पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूरमधून 4, कोल्हापूर 2, सांगली 1, पुणे 4 तर सातारा जिल्ह्यातून फलटणची एक जागा मागितली आहे. याबाबत लवकरच पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात व जयंत पाटील यांच्यासोबत बैठक होऊन निर्णय जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.