नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर काल नंदीग्राममध्ये अज्ञातांनी हल्ला केला असल्याचा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. निवडणूक प्रचारादरम्यान बुधवारी ४-५ जणांनी आपल्याला धक्काबुक्की करून ढकलल्यामुळे आपल्या पायाला जखम झाली, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.
रेयापारानजीक एका स्थानिक मंदिरात प्रार्थना केल्यानंतर ममता तेथून निघण्याच्या तयारीत असताना सायंकाळी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. असे असतानाच आता ममता यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी ममतांचा रुग्णालयामधील फोटो ट्विट करत भाजपाला इशारा दिला आहे.
.@BJP4Bengal Brace yourselves to see the power of people of BENGAL on Sunday, May 2nd.
Get READY!!! pic.twitter.com/dg6bw1TxiU
— Abhishek Banerjee (@abhishekaitc) March 10, 2021
अभिषेक यांनी ममतांचा रुग्णलयामधील फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये ममता रुग्णालयातील बेडवर असून त्यांच्या डाव्या पायाला प्लॅस्टर केल्याचे दिसत आहे. हा फोटो ट्विट करताना अभिषेक यांनी, “भाजपाने तयार रहावे. रविवारी २ मे रोजी त्यांना बंगालच्या लोकांची ताकद दिसणार आहे. तयार राहा,” असे म्हटले आहे. २ मे रोजी बंगालच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल असून मतपेटीमधून बंगालचे लोकं भाजपाविरुद्धचा राग व्यक्त करतील असे संकेत अभिषेक यांनी आपल्या ट्विटमधून दिलेत.
माझ्यावर हल्ला झालाय, असा दावा ममतांनी बुधवारी केला. ‘मी माझ्या गाडीबाहेर उभी होते व गाडीचे दार उघडे होते. मी मोटारीत बसत असताना ४-५ लोकांनी दार ढकलले, ते माझ्या पायावर आपटले. याने झालेल्या जखमेमुळे माझा पाय सुजला असून मला तापासारखे वाटत आहे’, असे ममता म्हणाल्या. त्यांना नंतर सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. हे नक्कीच ‘कारस्थान’ असल्याचा आरोप ममता यांनी केला. त्यांना झेड प्लस सुरक्षाकवच असल्यामुळे, त्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. दरम्यान, ममतांवरील या कथित हल्ल्याबाबत निवडणूक आयोगाने राज्य पोलिसांकडून अहवाल मागवला आहे. राज्यपाल जगदीप धनखड यांनी रात्री रुग्णालयात जाऊन ममता यांची विचारपूस केली.