कॉंग्रेसचे आज राज्यभर आंदोलन
मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करणारे पुस्तक प्रसिद्ध करणाऱ्या भाजपाविरोधात कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत.
छत्रपतींच्या नावाने मते मागून सत्तेवर आलेल्या भाजपाकडून शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी करण्याचा खोडसाळपणा सुरू आहे. शिवरायांचा वारंवार अवमान करणाऱ्यया भाजपाने देशाची माफी मागावी व ते पुस्तक मागे घ्यावे अशी मागणी करतानाच भाजपाविरोधात उद्या, मंगळवारी राज्यभर आंदोलन करुन तीव्र निषेध केला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
भाजपाचे दिल्लीतील नेते जयकुमार गोयल यांनी ‘आजके शिवाजी :नरेंद्र मोदी’ हे पुस्तक लिहिले असून या पुस्तकातून त्यांनी मोदींची तुलना शिवरायांशी केली आहे. शनिवारी, दिल्लीच्या भाजपा कार्यालयात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. पुस्तक प्रकाशन सोहोळ्याची माहिती स्वत: लेखक जयकुमार गोयल यांनी ट्विटवरून देताच त्यांचे देशभरात संतप्त पडसाद उमटले.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना भाजपाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला. या अगोदरही अजयकुमार बिष्ट आणि विजय गोयल यांनी नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांशी करण्याचा प्रयत्न केला होता, आताही ‘आजके शिवाजी :नरेंद्र मोदी’ या पुस्तकातून छत्रपतींचा अवमान केला आहे.
व्यक्तिगत राजकीय स्वार्थासाठी सीएए आणि एनआरसी च्या माध्यमातनू देशाला वेठीस धरणारे, धार्मिक तेढ निर्माण होईल अशा भूमिका घेणारे, नोटबंदीच्या माध्यमातून सामान्य जनतेला वेठीस धरणारे आणि महत्वाचे म्हणजे हुकूमशाही पद्धतीने कारभार करू इच्छिणा?्या नरेंद्र मोदींची कोणत्याच अर्थाने छत्रपती शिवरायांसोबत तुलना होऊ शकत नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केले नरेंद्र मोदी मात्र जाती धर्मात तेढ आणि विद्वेषाचे काम करत आहे. त्यामुळे महाराजांच्या नखाचीही सर मोदींना येणार नाही, अशी टीका थोरात यांनी केली. भाजपच्या या खोडसाळपणाचा कॉंग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर निषेध केला जाणार आहे.
उद्या मंगळवार, सकाळी 11 वाजता महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी, टिळक भवन, मुंबई येथे आपण स्वतः कार्यकत्र्यांसह आंदोलन करणार असून राज्यातील सर्वच कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हा व तालुकास्तरावर भाजपाविरोधात तीव्र आंदोलन करतील, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.