भाजप-शिवसेनेची जिल्ह्यात हॅट्ट्रिक

जयंत कुलकर्णी
विखेंचा एकतर्फीच विजय तर लोखंडेंची “नय्या’ मोदी लाटेत पुन्हा पार : वंचित आघाडीचा झटका कांबळेंनाच 

 
नगर – मतदान झाल्यानंतर तब्बल महिनाभर गॅसवर राहिलेल्या उमेदवारांसह नेते व कार्यकर्त्यांना अनपेक्षित असाच धक्‍का या निवडणूक निकालाने दिला आहे. विशेषतः कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या नेत्यांनी विजयाचा केलेला दावा फोल ठरला आहे. अर्थात भाजप-शिवसेना युती उमेदवारांसह नेत्यांच्या मनात देखील निकालाबाबत धाकधूक होती. परंतु मतदानानंतर जुळविलेल्या आकडेवारीवरून विजय युतीचा होणार दिसत असले तरी ठामपणे व्यक्‍त करता येत नव्हते. या विजयाने भाजप व शिवसेना युतीने विजयाची हॅटिट्रक साधली आहे. सन 2009, 2014 व आता 2019 च्या निवडणुकीत विजयीची पताका फडकविली आहे.

या लोकसभा निवडणुकीत नगर जिल्ह्याचे राजकीय समिकरणे बदलली. जिल्ह्यात संगमनेर वगळता उर्वरित सर्वच तालुक्‍यात कॉंग्रेसचा सुपटासाप झाला आहे. अर्थात शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या संगमनेरमध्ये आघाडी मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्याला भगवामय होत असल्याचे चित्र आहे. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांचे सुपूत्र डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता विखे देखील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील. आजचा निकालाची त्यांना प्रतीक्षा होती.

सुजय विखे खासदार झाल्याने तसेच राज्यात कॉंग्रेसचे रथीमहारथी धारातिर्थी पडल्यानंतर आता विखे कॉंग्रेसमध्ये राहणे शक्‍य नाही. त्यामुळे नगर जिल्हा निम्म्याच्यावर भाजपमय होईल. लोकसभा निवडणुक कार्यक्रम जाहीर होण्याअधिपासून नगर लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा वाद थेट राष्ट्रीय पातळीवर गेला होता. आघाडी झाली तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसने ही जागा कॉंग्रेसला म्हणजे विखेंना न सोडण्याची भूमिका घेतली होती. पक्षापेक्षा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी ही जागा लढविणार असल्याचे स्पष्ट करून विखेंचा पत्ता कट केला होता.

अर्थात राष्ट्रवादीकडे देखील उमेदवारांचा वानवाच होता. तरी या जागेचा आग्रह काही सोडला नाही.अनेकांची नावे चर्चिली गेली.राष्ट्रवादी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आपल्या उमेदवारांवर शिक्‍कामोर्तब केला. त्यानंतर राष्ट्रवादीने नाही हो करीत युवा आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली.

विखेंनी लोकसभेचे गेल्या तीन वर्षांपासून नियोजन केले होते. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने भाजप व शिवसेनेची ताकद बेरीज ठरणार होती. परंतू राष्ट्रवादीची ताकद मोजकीच त्यात होती तेवढी कॉंग्रेसची ताकद विखेंच्या मागे गेली. त्यामुळे जगताप यांची सर्व भिस्त राष्ट्रवादीच्या नेत्यांवर होती. जगताप यांनी अवघ्या 24 दिवसात संपूर्ण मतदार संघ पिंजून काढून विखेंसमोर आव्हान उभे केले होते. जगताप यांच्या सभांना होणारी गर्दी व त्यांचे गावागावात होणारे स्वागत पाहिल्यानंतर जगताप यांनी ही निवडणूक हातात घेतल्याचे दिसू लागले. सुरवातीला विखेंसाठी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक चुरशीची झाली होती.

शरद पवारांनी जातीने या मतदारसंघात लक्ष दिल्याने व जुळवाजुळव करून आणल्याने जगतापांसाठी ही निवडणुक महत्वाची ठरत गेली. अर्थात विखेंची ताकद काही कमी नव्हती. भाजपचे तीन व शिवसेनेचे एक आमदार असे चार विधानसभा मतदारसंघ ताब्यात होते. नाराज खासदार दिलीप गांधी यांनी मदत सुरू केल्याने विखेंच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता.

शरद पवारासह माजीमंत्री बाळासाहेब थोरात या मतदारसंघात तळ ठोकून होते. विखेंची कोंडी करण्याची एकही संधी राष्ट्रवादीने सोडली नाही. तोकडी ताकद असतांनाही जगताप यांनी कडवी झुंज दिली. शेवटच्या टप्प्यात विखेंसह समर्थक व भाजपचे नेते देखील ठामपणे विजयाची खात्री करण्यास धजावत नव्हते. एवढी चुरस झाल्याचे वातावरण निर्माण झाले. परंतू आज निकालाच्या दिवशी ज्या पद्धतीने फेऱ्या बाहेर पडत होत्या. त्यानुसार ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे दिसून आले. सुरवातीला जगताप यांना शेवगाव व पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळाली. परंतू सहाव्या फेरीनंतर सर्वच मतदारसंघातून विखेंना आघाडी मिळू लागली.

राष्ट्रवादीला अपेक्षित असलेली श्रीगोंदा, पारनेर व नगर शहरातील आघाडी खूप दुर राहिली.भाजपचे बुथपातळीवर असलेले नियोजन, आमदारांनी प्रमाणिकपणे केले काम, शिवसेनेने दिलेली साथ त्यामुळे विखेंना मोठा मताधिक्‍या मिळाले आहे. लोखंडे यांना पुन्हा मोदी लाटेने तारले आहे. अर्थात त्यांच्या मदतीला वंचित आघाडीच्या उमेदवारा आला हे लपून राहिले नाही. या वंचित आघाडीचा फटका कॉंग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना बसला. मत विभागणी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. वंचित आघाडीचे उमेदवार संजय सुखदान त्यांनी तब्बल 62 हजार 116 मते घेतली. या मत विभागणीमुळे कांबळे यांचे मताधिक्‍य कमी झाले. सन 2014 मध्ये अवघ्या 17 दिवसात लोखंडे खासदार झाले होते. खासदार झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघातील संपर्कच तोडला होता. त्यामुळे विकास कामांचा प्रश्‍न नाही. त्यामुळे सर्वच सर्वसामान्या नागरिकांसह शिवसैनिक देखील नाराज होते. त्यांनी लोखंडेंच्या उमेदवारीला विरोध केला होता. तरीही पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. लोखंडे यांची भिस्त भाजपच्या दोन आमदारांवर होती. त्यांनी प्रमाणिकपणे ही पाळल्याने आज कोपरगाव व नेवासा मतदारसंघातून मोठे मताधिक्‍य लोखंडेंना मिळाले.

अर्थात विखेंचा करिश्‍मा देखील या मतदारसंघातून दिसून आला. 23 एप्रिलला मतदान झाल्यानंतर लगेच विखेंची यंत्रणा 29 एप्रिलच्या निवडणुकी गेले. अवघ्या चार ते पाच दिवसात विखेंनी या मतदारसंघातील चित्र बदलून टाकले. त्यामुळे लोखंडेंना सर्व तालुक्‍यातील मताधिक्‍य मिळले. शिर्डी मतदारसंघाची सर्व जबाबदारी थोरातांवर होती. त्यांनी सर्व मतदारसंघ पिंजून काढून आवश्‍यक ते प्रयत्न केले. परंतू त्यांच्या मतदारसंघातून कांबळेंना फारसे मताधिक्‍य देता आले नाही. त्यामुळे हे लोखंडे यांच्या पथ्यावर पडले आहे. मतदारांनी लोकशाहीचा उत्सव आपल्या पद्धतीने साजरा केल्याने नेत्यांना गप्प बसण्याशिवाय पर्याय ठेवला नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×