शिवसेना – भाजप युतीचे जिल्ह्यात उमटणार पडसात

मैदान सेनेला मोकळे पण उमेदवार कोण?
फलटण
फलटण विधानसभा मतदारसंघ देखील युतीच्या जागा वाटपात शिवसेनेकडे राहिला आहे. सन 1996 च्या लोकसभा निवडणूकीत फलटणच्या हिंदूराव ना.निंबाळकरांनी मैदान मारले होते. मात्र, तरी देखील तेव्हापासून अद्यापपर्यंत सेनेला फलटण विधानसभेचा गड ताब्यात घेता आला नाही. 2014 मध्ये युती तुटली तेव्हा भाजपने जागा तत्कालिन मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली होती. स्वाभिमानीकडून लढलेल्या पोपटराव काकडेंना तेव्हा 24 हजार 529 तर शिवसेनेकडून लढलेल्या नंदकुमार तासगावकर यांना 15 हजार 704 मते मिळाली होती. मात्र, आता स्वाभिमानीने भाजपची साथ सोडली आहे तर तासगावकर हे देखील निवडणूकीनंर राजकारणात सक्रिय राहिल्याचे दिसून आले नाही. अशा स्थितीत मतदारसंघात भाजप व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष बांधणीच्या दृष्टीने प्रयत्न केले. परंतु भाजपमध्ये गटबाजी अधिक राहिल्याने पक्ष वाढ कमी झाली. नेमकी ती बाब सेनेच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे मतदारसंघावर सेनेचा दावा कायम राहणार आहे. फक्त प्रश्‍न उरतो तो उमेदवारी मिळणार कोणाला ?

शेवटच्या शिवसैनिकापर्यत अतुुलबाबांना जावे लागणार
कराड दक्षिण
विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसात अनेक राजकिय घडामोडी घडल्या. यात भाजप-सेना युतीचा विधानसभेचा 50-50 चा फॉर्मुला तयार झाला असल्याने मतदारसंघातील हालचालींना वेग आला आहे. कराड दक्षिणमध्ये कॉंग्रेसमधून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण हे निवडणुक रिंगणात असल्याचे संकेत असल्याने याठिकाणी भाजप-सेना युतीचा उमेदवार म्हणून डॉ. अतुल भोसले यांच्याच नावाची चर्चा आहे. मात्र नुकत्याच झालेल्या मलकापूर निवडणुकीत शिवसेनेने भाजपाबरोबर राहूनच काम केल्याने कराड उत्तर मतदार संघात विधानसभेला भाजप-शिवसेना हे एकत्रपणे ताकद लावतील. असा सद्यस्थितीत सूर आहे. मात्र यासाठी भाजपाचे डॉ. अतुल भोसले यांना शेवटच्या शिवसैनिकापर्यत जावे लागणार हे मात्र निश्‍चितच. शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांमधील असलेले रुसवे फुगवे काढून प्रत्येकाला आपलेसे करण्याचे मोठे आव्हान संभाव्य उमेदवारांपुढे आहे. यामुळे या मतदार संघात कधी काही उलथापालथ होईल, हे आत्ता तरी सांगणे जरा कठीणच आहे.

घोरपडे व कदमांचे काय? डोकेदुखी वाढण्याची शक्‍यता
कराड उत्तर 
कराड उत्तर विधनासभा मतदार संघातील राष्ट्रवादीची घोडदौड पाहता हा मतदार संघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यावर अनेक वर्षापासून आ. बाळासाहेब पाटील यांचेच वर्चस्व आहे. त्यांना शह देण्यासाठी शिवसेना व मित्रपक्षाच्या उमेदवारांनी बऱ्याचदा प्रयत्न केले. मात्र त्यांना यश मिळालेले नाही. हा या मतदार संघाचा पूर्वइतिहास आधोरेखित आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकांसाठी कराड उत्तर हा भाजप-शिवसेनेसाठी सोडण्यात आला आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपाचे मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांच्या नावाची चर्चा असली तरी शिवसेनेतूनही हुकमी एक्का बाहेर येण्याच्या हालचाली सुरु झालेल्या आहेत. यामुळे या मतदार संघात भाजपासाठी सोडायची की शिवसेनेसाठी याचा निर्णय पक्षीय पातळीवर होणार असल्याने हे पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसारच होणार आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कराड दक्षिण मध्ये मनोजदादा घोरपडे यांना यापूर्वीच एका कार्यक्रमावेळी कामाला लागा असे सांगीतले होते. मात्र कराड उत्तरला भाजपाचा उमेदवार दिला तर कराड दक्षिण शिवसेनेचा उमेदवार देणे पक्षश्रेष्ठींना भाग आहे. असे झाले तर मग घोरपडे व कदमांचे काय? अशीही डोकेदुखी वाढण्याची शक्‍यता आहे.

पाटणकर व देसाई गट यांच्यामध्येच लढत
पाटण 
पाटण विधानसभा मतदार संघात माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर गट व विद्यमान आमदार शंभूराज देसाई गट यांच्यामध्ये पारंपारिक निवडणुका होत असतात. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या युती बंधनानंतर जिल्ह्यातील इतर मतदारसंघात काही अंशी फेरबदल झाले तरी पाटण विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेसाठी राखीव असून याठिकाणी आ. शंभूराज देसाई हेच उमेदवार असणार हे निश्‍चित असून भाजपमध्ये नुकतेच दाखल झालेले माथाडीचे नेते नरेंद्र पाटील यांची पाटण विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची शक्‍यता होती. मात्र त्यांना भाजपा सरकारने अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाने अध्यक्षपद दिल्यामुळे त्यांची विधानसभेसाठीची उमेदवारीची शक्‍यता संपुष्ठात आली आहे. तर पाटण तालुक्‍याचे शिवसेनेचे नेते जयवंतराव शेलार हे पुर्वीपासूनच आ. शंभूराज देसाई यांचे नेतृत्व माननारे असणारे आ. देसाई यांचा सुकर बनला आहे. यामुळे या निवडणुकीत ना. नरेंद्र पाटील यांच्या ताकदीचा फायदा आ. देसाई यांना होणार, हे निश्‍चितच.

तिढा सोडविण्याचे मोठे आव्हान
माण खटाव 
माण विधानसभा मतदारसंघ युतीच्या जागा वाटपात शिवसेनेच्या वाट्याला राहिला. मात्र, अद्यापर्यंत मतदारसंघावर शिवसेनेचा झेंडा फडकविता आलेला नाही. अशा स्थितीत मागील निवडणूकीत युती तुटली. तेव्हा भाजपने हा मतदारसंघ रासप या मित्रपक्षाला दिला होता. रासपने तेव्हा उमेदवारी दिलेले शेखर गोरे यांनी पुढे रासप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. परिणामी रासपची म्हणावी अशी वाढ झाली नाही. तर शिवसेनेने रणजितसिंह देशमुख यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर देशमुख देखील पक्षात फारसे सक्रिय न राहिल्याने ते आगामी निवडणूक लढण्याबाबत साशंका व्यक्त करण्यात येत आहे. अशा स्थितीत भाजपने मात्र, जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपच्यावतीने जिल्हा बॅंकेचे संचालक अनिल देसाई व माजी आमदार डॉ.दिलीप येळगावकर हे तगडे उमेदवार भाजपकडे आहेत. तर त्या तुलनेत राष्ट्रीय समाज पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार नाही. मात्र, अशावेळी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांची भूमिका निर्णायक राहणार आहे. साहजिकच माण तालुक्‍याचे सुपुत्र असल्यामुळे ते मतदारसंघावर दावा सांगणार हे निश्‍चित आहे. त्यामुळे देसाई व येळगावकर यांनी इतक्‍या वर्षात केलेल्या तयारीचे काय होणार हा प्रश्‍न निर्माण होणार आहे. तसेच जरी मतदारसंघ भाजपला सोडला तर उमेदवारी नेमकी कोणाला हा देखील प्रश्‍न आहे.

महेश शिंदे की रणजितसिंह भोसले ? 
कोरगाव
युतीच्या फॉर्म्युल्यात कोरगाव विधानसभा मतदारसंघ कायम शिवसेनेकडे राहिला आहे. सन 1995 च्या निवडणूकीपर्यंत मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला चार अंकांच्यावर मतांचा टप्पा ओलांडता आला नव्हता. सन 2009 च्या निवडणूकीत मात्र संतोषभाऊ जाधव यांनी 16 हजार 621 मते प्राप्त करून सेना वाढीच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. परंतु सन 2014 च्या निवडणूकीत युती तुटली अन मतांची आकडा थोडा घसरला. त्या निवडणूकीत हणमंतराव चवरे यांना 15 हजार 786 मते मिळाली. साहजिकच युती तुटल्यामुळे तेव्हापासून मतदारसंघात भाजपच्यावतीने महेश शिंदे यांनी तर शिवसेनेच्यावतीने रणजितसिंह भोसले यांनी विधानसभा निवडणूक लढण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली. परंतु आता लोकसभेसह विधानसभेच्या निवडणूकीत युती होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कोरेगाव मतदारसंघ पारंपारिक शिवसेनेच्या वाट्याला जाणार की महेश शिंदेंसाठी भाजप पक्ष श्रेष्ठी दावा सांगणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.