राज्यात पुन्हा भाजप-शिवसेना युतीचेच सरकार येणार : प्रा. राम शिंदे

शेवगाव  – गेल्या पाच वर्षात देशात आणि राज्यात झालेल्या विकासकामावरुन केलेले मतदान कारणी लागल्याचे मतदारांना पटले आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीतही राज्यात भाजपा युतीचेच सरकार येणार आहे, ही काळया दगडावरील रेघ आहे. हे सांगण्यासाठी कोणा भविष्यकाराची गरज नाही. विरोधकांचा एवढा अवमेळ आहे की त्यांचा मेळ होईपर्यंत निवडणूक संपलेली असेल, असे प्रतिपादन राज्याचे पणन मंत्री तथा पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी येथे केले.

शेवगाव येथे भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज शेवगावात आयोजित करण्यात आला होता, यावेळी पालकमंत्री शिंदे अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी नगरसेवक महेश फलके, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, दिनकर गर्जे, आशा गरड, डॉ. अरुण पवार, नगरसेवक अरुण मुंढे, कचरु चोथे, तुषार वैदय, विनोद मोहीते, बाबा गोर्डे, शिवाजी भिसे, नारायण जाधव, विनायक नजन, सालारभाई शेख, विनायक खेडकर, शिवसेनेचे भरत लोहकरे, एकनाथ कुसळकर आदींसह शेवगाव पाथर्डी मतदार संघातून असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
प्रा. शिंदे म्हणाले, आचार संहितेपुर्वी सर्व मंजूर झालेली कामे मार्गी लागतील. ज्या कामाची भुमिपूजने झाली ती निश्‍चित सुरु होतील. नि:संदिग्धपणे आमदार मोनिका राजळे यांच्या कामाचे श्रेय मान्य करत लोकसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघातून डॉ. सुजय विखे यांना 63 हजाराचे मताधिक्‍य दिले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही माझ्या जामखेड मतदारसंघापेक्षा आमदार राजळे यांनी आपल्या शेवगाव पाथर्डी मतदार संघासाठी अधिक निधी आणला आहे.

वैयक्तिक दुःखाचा डोंगर बाजूला सारून त्यांनी सामाजिक बांधिलकी पत्करून मतदार संघात मोठी विकास कामे केली आहेत. त्यामुळे त्या तर आमदार होणारच आहेत पण नामदार करण्यासाठी त्यांना मोठ्या मताधिक्‍यांनी निवडून दया असे अवाहन शिंदे यांनी केले. आ. राजळे म्हणाल्या, मतदारसंघात जाती पातीचे राजकारण पेरले जात आहे. मात्र आपण कामे करतांना कधीच जातीचा विचार केला नाही. सामान्य कार्यकर्त्यांना विकासधारेत आणण्यासाठी सदैव कार्यरत राहीले. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आपल्या सर्वांचा विश्‍वास आहे. आजवर आपण केलेल्या कामावर सर्वाधिक मते मिळायला हवीत. त्यासाठी आपले पाठबळ हवे. यावेळी देवटाकळी येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप खरड यांच्या समवेत सुमारे शंभर कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी पक्षाकडे उमेदवारी मागणारे तथाकथीत भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते मात्र मेळाव्याकडे फिरकले नाहीत.

पक्षात येणाऱ्यांकडे लागले लक्ष

यावेळी पालकमंत्री म्हणाले भाजपमध्ये विखे, पिचड, नाईक, मोहीते सर्वच आले आहेत. वातावरण बदलले आहे. आता उद्या कोणाचा प्रवेश असेल याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)