मुंबई – आगामी मुंबई पालिका निवडणूकीच्या तोंडावर शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)कडून शिवगर्जना यात्रेला सुरुवात झाली आहे. स्थानिक पातळीवर पक्षसंघटना वाढवण्याकरता संजय राऊत, सुषमा अंधारेंसह अनेकजण मैदानात उतरले आहेत.
आता भाजपनेही लोकसभेच्या तयारीला सुरुवात केली असून भाजपा-शिवसेना (शिंदे गट) महायुतीकडून रविवारपासून मुंबईतील सहा जिल्ह्यांत आशीर्वाद यात्रा सुरू करण्यात येणार आहे. याबाबत भाजप आमदार ऍड. आशिष शेलार यांनी माहिती दिली.
आशिष शेलार म्हणाले, स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि शिवसेना हा पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून याच अनुषंगाने भाजप आणि शिवसेना यांच्या वतीने मुंबईतील सहा लोकसभा क्षेत्रात आशीर्वाद यात्रा रविवारी (ता. 5) मार्चपासून सुरू होत आहे.
दीड दोन तासांचा प्रवास करून प्रत्येक लोकसभेतील एका पावन प्रसिद्ध मंदिरात दर्शन घेऊन यात्रा पुढे जाईल. अशा सहा यात्रा संपन्न होतील, अशी माहिती त्यांनी दिली.