खासदार नवनीत राणांना भाजपकडून ‘जय श्रीराम’ लिहिलेली 5000 पत्रं

पुणे : ‘जय श्रीराम’ या वाक्यावरुन देशात राजकारण चांगलंच तापलं आहे. पश्चिम बंगालनंतर आता महाराष्ट्रतही यावरून राजकारण होताना दिसत आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत खासदार नवनीत कौर राणा यांना भाजप कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’ लिहिलेली 5,000 पोस्टकार्ड पाठवली आहेत.

ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यत राबविली जात असून, आज एकट्या दर्यापूर तालुक्यातून पाच हजार पत्र खासदार नवनीत राणा यांना पाठवण्यात आल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

नवी दिल्ली येथील 17व्या लोकसभेच्या प्रथम अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी भाजपच्या खासदारांनी लोकसभेमध्ये ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या होत्या. त्यावर नवनीत कौर राणा यांनी आक्षेप नोंदवत लोकसभा हे अशा घोषणा देण्याचे स्थान नसल्याचं म्हटलं होतं. याप्रकरणी आता भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस अतुल गोळे आणि विनय गावंडे यांनी अभियान चालवण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतरच भाजप कार्यकर्त्यानी खासदार नवनीत राणा यांना ‘जय श्रीराम’ लिहिलेले 5000 पोस्ट कार्ड पाठवण्यात आले.

लोकसभेतील ‘जय श्रीराम’ घोषणांना खासदार नवनीत कौर राणांचा आक्षेप

तसेच भारतातील बहुसंख्य नागरिकांचे श्रद्धास्थान श्रीराम आहेत, त्यांच्या उच्चाराने खासदार नवनीत राणा यांना कसला त्रास झाला? हे नवनीत राणांनी स्पष्ट करावं, असा सवाल भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळं आता नवा वाद उफाळून येण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.

दरम्यान, गेल्या ३१ मार्च रोजी पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा ताफा जात असताना काही लोकांनी ‘जय श्रीराम’चा नारा दिल्याने संतापलेल्या ममता बॅनर्जी यांनी ‘जय श्रीराम’चा नारा देणाऱ्या ‘त्या’ ८ लोकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या घटनेनंतर लोकसभा निवडणुकांदरम्यान देखील भाजप नेत्यांनी ‘जय श्रीराम’ घोषणेवरून मनात बॅनर्जींना चांगलेच धारेवर धरले होते. तसेच देशभरातील हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या नावे ‘जय श्रीराम’ लिहिलेली पत्र पाठवली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.