भाजप-सेना युतीची सोशल मीडियावर खिल्ली

सातारा – गेली25 वर्ष महाराष्ट्रात शिवसेना-भाजपची हिंदुत्वाच्या मुद्‌द्‌यावर राजकीय युती झाली होती पण, गेली साडेचार वर्षात राजकीय विरोध करण्याची संधी दोन्ही बाजूंनी सोडली नाही. आता भाजपने शिवसेनेची वाघनखे काढून युती करण्यास भाग पाडले अशी टीका सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे.

सातारा जिल्हात पूर्वी कट्टर शिवसैनिकांचा प्रभाव होता. शिवसेनेच्या दरारा पुढे इतर पक्षाचे राजकारण चालत नव्हते. छत्रपती घराण्याचे विद्यमान उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांच्या 1996 साली लोकसभा निवडणुकीत तत्कालीन शिवसेनेचे उमेदवार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी पराभव केला होता. आता सातारा जिल्ह्यातील शिवसेना चांगलीच बॅकफूटवर आली आहे. राष्ट्रवादी ,कॉंग्रेस,भाजप, रासप, भारिप-बहुजन महासंघ या पक्षाचे जिल्हात जाळे निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत गेली चार वर्षे भाजपने स्थानिक पातळीवर शिवसेना नेते व शिवसैनिकांना गृहित न धरता वाटचाल सुरु केली. त्याला शिवसेनेने जशास तसे प्रतिउत्तर दिले होते. आता पुन्हा भाजप-सेना युती झाल्याची घोषणा मुबंईत जाहीर करण्यात आली. त्यानंतर सोशल मीडियावर भाजप पेक्षा शिवसेनेला टार्गेट केले जात आहे.

“सत्तेला लाथ मारून बाहेर पडेन’ या वाक्‍याला भावपूर्ण श्रद्धांजली, भाजपवर टीका करून पुन्हा युती करून दाखवली, भाजपच्या मिठीत की मूठीत, स्वाभिमान गुंडाळून ठेवू पण, भाजपच्या युतीसाठी सर्व गोष्टी विसरू, जशास तसे उत्तर नव्हे आता फक्त युती आणि युती, अशा पद्धतीने कमेंट्‌स येत आहे तर गोमू संगतीने माझ्या तू येशील का? या गीतावर व्हिडीओ कोणीतरी बनवला आहे, तो झपाट्याने व्हायरल झाला आहे.या बाबत मनसे सैनिकांनी मौंनधारण करण्यातच धन्यता मानली आहे.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर उभी असलेल्या शिवसेनेला डिवचण्याची कोणाची हिंमत नाही, भाजप-सेना व मित्रपक्षाच्या मतांची विभागणी होऊ नये व हिंदूत्व रक्षणासाठी ही युती झाली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा जन्म कॉंग्रेस पक्ष फोडून झाला आहे. त्यांची आघाडी झाली तर चालते मग, भाजप-सेना युती झाली तर त्यात काही वावगे नाही. शिवसेना नेत्यांनी आदेश दिला आहे. आता कोणीही सच्चा शिवसैनिक भाजप व केंद्र ,राज्य सरकारवर टीका करणार नाही अशी प्रतिक्रिया सातारा जिल्हा शिवसेना माजी जिल्हाप्रमुख हणमंतराव चवरे-पाटील,विभागप्रमुख रमेश बोराटे यांनी दिली आहे. भाजपचे नेते व माजी आमदार डॉ दिलीप येळगावकर यांनी या युतीचे स्वागत केले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी सातारा जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते व शिवसैनिक यांची सन्मान पूर्वक बैठक घेण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)