अण्णाद्रमुकशी युती करण्यावर भाजपकडून शिक्कामोर्तब

मदुराई – तामीळनाडूतील सत्तारूढ अण्णाद्रमुकशी युती करण्यावर भाजपने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे त्या राज्यात एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला दोन्ही पक्ष एकत्रितपणे सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची शनिवारी येथे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिली सभा झाली. त्यामध्ये बोलताना नड्डा यांनी भाजप-अण्णाद्रमुक युती कायम राहणार असल्याचे जाहीर केले. केंद्रात कॉंग्रेसची राजवट असताना तामीळनाडूकडे दुर्लक्ष करण्यात आले.
मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या विकासासाठी अनेक प्रकल्प सुरू केले, अशी भूमिका मांडत नड्डा यांनी तामीळी जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. नड्डा यांनी युतीची ग्वाही दिल्याने त्याविषयीची अनिश्चितता आता संपली आहे.
तामीळ सुपरस्टार रजनीकांत यांनी याआधी राजकारणात प्रवेश करून तामीळनाडूतील निवडणूक लढवण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यांच्याशी हातमिळवणी करण्याला भाजप प्राधान्य देईल, अशा चर्चांना काही काळ तोंड फुटले होते.
मात्र, प्रकृतीच्या कारणांवरून रजनी यांनी राजकारण प्रवेशाची इच्छा गुंडाळून ठेवली. त्यानंतर भाजपच्या गोटातून सातत्याने अण्णाद्रमुकबरोबर जाण्याचे संकेत देण्यात आले. आता नड्डा यांच्या घोषणेमुळे चित्र पूर्ण स्पष्ट झाले आहे.





