मुंबई : शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुळे सध्या राज्याच्या राजकारणात गोंधळ निर्माण झाला आहे. दिपाली सय्यद यांनी मोदींवर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर भाजपा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप नेत्या उमा खापरे यांनी दिपाली सय्यद यांना इशारा देत “घरात घुसून मारू” असा धमकीवजा इशारा दिला आहे.
उमा खापरे यांनी दिपाली सय्यद यांच्याविषयी बोलताना,“फक्त प्रसिद्धीसाठी वक्तव्यं केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत बोललो तर लगेच प्रसिद्धी मिळेल हे त्यांना माहिती आहे. पण यानंतर त्या बाईने पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाच्या इतर नेत्यांबाबत वक्तव्यं केलं तर घऱात घुसून बदडून काढू. आम्ही गप्प बसणार नाही,” असा इशारा भाजपा नेत्या उमा खापरे यांनी दिला आहे.
दरम्यान, दिपाली सय्यद यांनी उमा खापरेंच्या इशाऱ्याला सडेतोड उत्तर दिले आहे. “तुम्ही काय माझ्या घऱात, शिवसेना भवनात घुसून बदडून काढणार आहात? म्हणजे तुम्हाला याव्यतिरिक्त दुसरं राजकारण करताच येत नाही. सुरुवात तुम्ही करायची आणि आम्ही काही बोललो की आम्ही वाईट होणार”.
“नक्कीच कोणाबद्दल अशी वक्तव्यं केली नाही पाहिजेत. जसे तुमच्यासाठी पंतप्रधान महत्वाचे आहेत तसा मुख्यमंत्र्यांचा दर्जा नाहीये का? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाला काही किंमत नाही का? तुम्ही काहीही बोलायचं, उचलली जीभ लावली टाळ्याला हे बरोबर आहे का? काय करायचं ते करा…येताय ना माझ्या घऱी, पाहतेच मी,” असं प्रतीआव्हान दिपाली सय्यद यांनी दिलं आहे. “तुम्ही काय माझ्या घरात घुसणार आहात? तेवढी तुमची ताकद आहे का बघा,” असा खोचक टोलाही त्यांनी भाजपाला लगावला आहे.
“पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह बोलणं चुकीचं आहे हे पूर्ण महाराष्ट्र जाणतो. पण सुरुवात कोणी केली? हे भाजपाचं राजकारण आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात, माझी बायको माझं ऐकत नाही. म्हणून तिला काय वाऱ्यावर सोडलं आहे का? ती बोलते तर तुम्ही खपवून घेताय. ती कुणाबद्दल बोलते? मुख्यमंत्र्यांबाबतच बोलतात ना. किरिट सोमय्यांनी सर्वात आधी वक्तव्य केलं त्यावर मी बोलले. चंद्रकांत पाटील आधी मसणात जा बोलले आणि नंतर पलटी मारतात. म्हणजे तुम्ही जे बोलता ते सगळं शुद्ध, पवित्र. तुम्ही बोलता ते ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांकडे बोट करायचं. तुम्ही काय माझ्या घरात घुसणार आहात? तेवढी तुमची ताकद आहे का बघा. केसेस करायची असेल तर आधी तुमच्या नेत्यांवर करा. माझ्यावर केस केली तर तुमचे दोन नेते आतमध्ये घेऊन जाईन,” असा इशारा दिपाली सय्यद यांनी बोलताना दिला आहे.