भाजपकडून आमचं ठरलंय म्हणण्यात कुचराई

बारामतीत कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक : चंद्रकांत पाटलांच्या वक्‍तव्यामुळे संभ्रमाचे वातावरण 

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला, त्यानंतर भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली होती. मात्र, बारामती विधानसभेत अजित पवार यांच्या विरोधात 2019 च्या निवडणुकीत विजय संपादन करणे हा केवळ “आशावाद ठरेल’ असे वक्‍तव्य चंद्रकांत पाटील यांनी बारामती येथे नुकतेच केले होते, त्यामुळे भाजप इच्छुक “आमचं ठरलंय’ असे ठामपणे म्हणू शकत नसले तरी त्यांना आमदारकीचे वेध लागले, हे निश्‍चित! दरम्यान, भाजप येथे “कमळा’च्या चिन्हावर उमेदवार देणार की नाही, की मित्रपक्षाला ही जागा सोडणार, हे स्पष्ट नसल्याने बारामतीतील “इच्छुक’ कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची नाकेबंदी करण्याची रणनीती आखली आहे. याची उजळणी लोकसभा निवडणुकीत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पश्‍चिम महाराष्ट्रात यशस्वीपणे केली. सुशीलकुमार शिंदे, राजू शेट्टी, धनंजय महाडिक यांना पुन्हा संसदेत जाण्यापासून रोखले, तर सुप्रिया सुळे यांच्या पराभवासाठी बारामतीत दीर्घकाळ ठाण मांडले होते. पार्थ पवार ही पवार घराण्याची नवी पाती पहिल्याच निवडणुकीत पराभूत झाली. हाच धडाका विधानसभा निवडणुकीत राबवण्याचा पाटील यांचा मनसुबा असून, त्या दृष्टीने पश्‍चिम महाराष्ट्रातील बड्या नेत्यांवर त्यांची नजर आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी राज्यात सर्वाधिक मताधिक्‍य मिळवत विक्रम प्रस्थापित केला होता. हाच विक्रम, त्यांची लोकप्रियता आणि त्यांनी बारामतीसाठी केलेली विशेष कामे लक्षात घेता बारामती विधानसभेत “कमळा’च्या चिन्हावर उमेदवार उभा केला तर मोठी नाचक्की होईल, हे चंद्रकांत पाटलांनी ओळखले आणि अजित पवारांचा पराभव करण्याचे शक्‍य नसल्याचे जाहीर केले, त्यामुळे भाजप आता बारामतीसाठी काय “गणित’ आखणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत, तर पाटलांच्या “आशावाद’ या वाक्‍यामुळे शिवसेनेबरोबरच राष्ट्रीय समाज पक्ष देखील बारामतीच्या जागेवर दावा करीत आहेत.

बारामती विधानसभेची जागा मूलतः शिवसेनेची आहे. मात्र, शिवसेनेपेक्षा बारामती विधानसभेत भाजपचे प्राबल्य अधिक आहे. त्यामुळे शिवसेनेची जागा असली तरी ती भाजपच्या वाट्याला जाणार असल्याचे बोलले जात असल्याने भाजप कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरोधात आमदारकी लढवण्यासाठी भाजपाचे अनेक शिलेदार सज्ज झाले आहेत. आमदारकीचे तिकीट आपल्याच झोळीत कसे पडेल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अजित पवार विरुद्ध भाजपचे बाळासाहेब गावडे अशी लढत झाली होती, तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या नावांची चर्चा..
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रंजन तावरे, महानंदा दूध संस्थेचे संचालक दिलीप खैरे, भाजपाचे प्रशांत सातव, भाजपचे माजी जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)