मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे ही सोशल मीडियातील पोस्टमुळे सतत वाद आणि चर्चेत येत असते. केतकी चितळे हिने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिले आहे. यावरून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून तिच्यावर सडकून टीका केली जात आहे. तर या विखारी टीकेमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप असल्याचा आरोपही राष्ट्रवादीने केला आहे.
केतकी चितळे हिने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिले आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचेही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त फेसबूक पोस्टनंतर कळवा पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी संघावर निशाणा साधला आहे. केतकी चितळे असेल किंवा शरद पवार यांना जीवे मारण्याबाबत ट्वीट करणारा भामरे असेल. यांना लहानपणी संघाच्या शाखेत जे विषारी बाळ कडू मिळालं त्याची उदाहरणे असल्याचे चव्हाण यांनी म्हटले.
विद्या चव्हाण म्हणाल्या की, हे सगळं घडवून आणण्याचं काम विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून होतं आहे. त्यांनी गावा गावात 25-25 हजार रुपये पगार देऊन ट्रोलर्स नेमले आहेत. त्याच्या माध्यमातून अशाप्रकारे विष पसरवण्याचा प्रयत्न होतं असल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी केला.