हैदराबाद : हैदराबाद महापालिका निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. रात्री दहा वाजता हाती आलेल्या बातमीनुसार, भारतीय जनता पक्षाने जोरदार धक्के देत तेलंगण राष्ट्र समितीसह एमआयएमला विचार करायला भाग पाडले आहे. मागील निवडणुकीत केवळ तीन जागा मिळवणाऱ्या भाजपाने आतापर्यंत 48 जागा जिंकल्या आहेत. टीआरएसला सर्वाधिक 55 तर एमआयएमला 44 जागा मिळाल्या आहेत. तर कॉंग्रेसला अवघ्या 2 जागा मिळाल्या आहेत.
आतापर्यंतचे कल पाहता असदुद्दीन ओवेसींचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या हैदराबादमध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता सुरुवातीपासूनच व्यक्त होत होती. प्रथम टीआरएसने जोरदार मुसंडी मारली आहे. कल चाचण्यांमध्ये भाजपला बहुमताचा आकडा गाठता येईल, असे भाकित व्यक्त करण्यात आले होते. परंतु हळूहळू टीआरएसचं वर्चस्व वाढलं आणि भाजप पक्ष दुसऱ्या स्थानावर गेला.
150 जागांच्या हैदराबाद महापालिकेसाठी (गीएचएमसी-बृहन हैदराबाद महानगरपालिका) 1 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरद्वारे मतदान पार पडलं होतं. जीएचएमसी निवडणुकी 1122 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक प्रचारात सर्वच पक्षांनी जोर लावला होता. भाजपने या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जबरदस्त प्रचार आणि प्रसार केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, स्मृती इराणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी हैदराबादमध्ये जाऊन प्रचार केला होता.
ग्रेटर हैदराबाद महापालिका (GHMC) देशातील सर्वात मोठ्या महापालिकांपैकी एक आहे. ही महापालिका चार जिल्ह्यांमध्ये आहे, ज्यात हैदराबाद, मेडचल-मलकजगिरी, रंगारेड्डी आणि संगारेड्डीचा समावेश आहे. संपूर्ण परिसरात 24 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तर तो तेलंगणाचे पाच लोकसभा मतदारसंघ यात समाविष्ट आहेत. यामुळेच हैदराबाद महापालिका निवडणुकीत केसीआर यांच्यासह असदुद्दीन ओवेसी, भाजप आणि कॉंग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
वर्ष 2016 मध्ये झालेल्या हैदराबाद महापालिका निवडणूकीत टीआरएसने 150 पैकी 99 जागांवर विजय मिळवला होता. तर एमआयएमलाला 44 जागा मिळाल्या होत्या. भाजपला केवळ तीन जागांवर विजय मिळवता आला होता. तर कॉंग्रेसच्या खात्यात दोनच जागा जमा झाल्या होत्या. दरम्यान, भाजपाच्या या यशाबद्दल पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह गृहमंत्री अमित शहा यांनी स्थानिक भाजपा नेत्यांना यशाचे श्रेय दिले आहे.