आसामात भाजपने सत्ता राखली!

गुवाहाटी – मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने आसामातील आपली सत्ता कायम राखली आहे. त्यांनी कॉंग्रेसचे आव्हान मोडीत काढून स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. कॉंग्रेसने प्रियांका गांधी यांना या राज्यातील प्रचारांत प्रथमच उतरवले होते. पण त्या प्रयोगाचाही येथे फार प्रभाव पडू शकला नाही.

धार्मिक आधारावर करण्यात आलेले मतांचे ध्रुवीकरण आणि ऐन निवडणुकीतही विरोधकांचे उमेदवार फोडण्यासाठी केलेला प्रयोग ही निवडणूक स्ट्रॅटेजी येथे भाजपच्या कामी आली.

कॉंग्रेसने येथे सात प्रमुख पक्षांच्या बरोबर महाज्योत म्हणजेच महा आघाडी स्थापन केली होती. या आघाडीत बोडो लॅंड पिपल्स फ्रंट हा प्रमुख पक्षही भाजपची साथ सोडून सामील झाल्याने कॉंग्रेस आघाडीच्या विजयाची शक्‍यता वाढली होती. 

तथापि, भाजपने आसाम गण परिषद आणि युनायटेट पिपल्स पार्टी लिबरल या पक्षाची भक्कम साथ मिळवून येथे बाजी मारली. 126 जागांपैकी भाजपने येथे 92 उमेदवार दिले होते. 26 जागा आसाम गण परिषद या पक्षाला देण्यात आल्या तर आठ जागा युनायटेड लिबरल पार्टीला देण्यात आल्या होत्या. 

कॉंग्रेसने येथे एआयडीयूएफ या मुस्लीम बहुल पक्षाशी आघाडी केली होती. त्याच्या विरोधातच भाजपने प्रचारावर भर देण्याची स्ट्रॅटेजी करीत मतांचे धार्मिक आधारावर ध्रुवीकरण केले असा आरोप केला गेला. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय जनता दल, एपीआय, एजीएम आणि जेपीपी हे पक्षही कॉंग्रेस आघाडीत होते. 

त्यांनी मतांची मोट बांधण्याचा केलेला प्रयत्न मात्र फारसा कामी आला नाही. सीएए आणि एनआरसी हा येथे निवडणुकीचा मुद्दा करण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केला, पण त्याचाही काही लाभ कॉंग्रेस आघाडीला मिळू शकला नाही. कॉंग्रेसने उभे केलेले कडवे आव्हान मोडीत काढून सत्ता शाबूत राखण्यात येथे भाजपला यश आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.