भाजपचा निष्ठावानांपेक्षा आयारामांवरच भरोसा!

कार्यकर्त्यांसह जनमानसाला पडलेला प्रश्‍न : विधानपरिषदेवर हर्षवर्धन पाटलांना संधी मिळण्याची चर्चा

– रोहन मुजूमदार

पुणे – केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी तर राज्यात देवेंद्र फडणवीस या घोषणेवर 2014मध्ये भाजपने केंद्रात व राज्यात सत्ता मिळवली. तर 2019मध्येही याच घोषणेवर पुन्हा केंद्रात सत्ता मिळवली तर राज्यात क्रमांक एकचा पक्ष ठरूनही “अतिउत्साहा’मध्ये सत्ता घालून विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. दरम्यान, 2019मध्ये एकहाती सत्ता मिळावी म्हणून जो कोणी येईल त्याला पक्षात स्थान दिले; नव्हे तर पक्षनिष्ठावंतांना डावलून तिकीटही दिले. यातील अर्धा डझन “आयाराम’ साफ तोंडावर आपटले. तरी भाजपच्या पक्षनेतृत्त्वाचे डोळे उघडले नसून राज्यसभा व विधान परिषदेच्या रिकाम्या होणाऱ्या जागेवर पुन्हा पक्षातील निष्ठावंतांना डावलून “आयारामांना’ संधी मिळण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत असल्याने भाजपचा पक्षनिष्ठावंतांपेक्षा “आयारामां’वर “भरोसा’ आहे का, असा सवाल कार्यकर्त्यांसह जनमाणसाला पडला आहे.

विधानसभा सदस्यांतून निवडून द्यावयाच्या नऊ जागांवरील विधान परिषद सदस्य निवृत्त होणार आहेत. त्यात सध्या भाजपकडील तीन सदस्य निवृत्त होतील. यात सध्याच्या विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार जण विधानपरिषदेवर निवडून येऊ शकतात. या चार जागांपैकी एका जागेवर विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये “एन्ट्री’ घेतलेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना संधी दिली जाण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

खडसे, पंकजा मुंडे, तावडे, बावनकुळे यांचे काय?
भाजप वाढीसाठी आणि भाजपशी एकनिष्ठ असलेले एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट या विधानसभा निवडणुकीत कापण्यात आले होते. तर पंकजा मुंडेंचा पराभव झाला होता. मुंडे, खडसे यांनी पक्षातंर्गत होणाऱ्या कारवायांवर बोट ठेवले होते. तरी वरिष्ठांकडून त्याची हवी तेवढी दखल घेतलेली दिसत नाही. आता त्यांचे किमान विधानपरिषदेवर पुनर्वसन करण्याची आलेली संधी भाजप डावलून “आयारामांना’च संधी देणार का? हे लवकरच कळेल.

हर्षवर्धन पाटील ठरणार योग्य निवड
विधान परिषदेत भाजपच्या वाट्याला चार जागा येण्याची शक्‍यता आहे. त्यातील एका जागेवर हर्षवर्धन पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय वर्चस्व आणि अभ्यासाचा सोबतच बारामतीकरांना कडवे “आव्हान’ पाटील उपस्थित करू शकतात, हे भाजप जाणून आहे. बरामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा 2024मध्ये पराभव करण्यासाठी हर्षवर्धन पाटील योग्य उमेदवार असल्याने त्यांना आतापासून बळ दिले तर 2024मध्ये त्याचा फायदा होण्याचा कयास भाजपने लावला असल्याचे राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेही आयारामच
विधानपरिषदेचा विरोधी नेता निवडतानाही भाजपने निष्ठावानापेक्षा मनसेतून भाजपात आलेले प्रवीण दरेकर यांच्यावर भरोसा दाखवल्याने भाजपचा आयारामांवर अधिक विश्‍वास असल्याचे स्पष्ट दिसून आले. तर दरेकर यांच्याऐवजी एक सक्षम विरोधी पक्षनेते पदाची भूमिका पार पाडलेल्या एकनाथ खडसे यांची वर्णी लावली असती तर त्यांचे राजकीय पुनर्वसनही करता आले असते; मात्र, त्यांच्या प्रकृतीचा विचार करता त्यांना संधी दिली नसावी असेही बोलले जात आहे.

राज्यसभेवर उदयनराजे भोसलेंना संधी?
येत्या एप्रिल, जून आणि जुलै महिन्यात राज्यसभेची भरती केली जाणार आहे. यावेळी भाजपकडून साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांना संधी दिली जाण्याची संधी आहे. त्यामुळे राज्यसभेतही भाजपने निष्ठावंतांना डावलून नुकतेच भाजपात दाखल झालेल्या भोसलेंचा चेहरासमोर केल्याचे बोलले जात असल्याने भाजपमधील नाराजांची संख्या वाढण्याची भीती राजकीयवर्तुळात व्यक्‍त होत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.