अहमदाबाद – गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार संपायला आता जेमतेम तीन दिवस राहिले असताना भारतीय जनता पक्षाने आपला निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला आहे. त्यात पुढील पाच वर्षात राज्यातील युवकांना 20 लाख नोकऱ्या देण्याचे तसेच विद्यार्थिनींना इलेक्ट्रिक स्कूटर देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांच्या हस्ते भाजपचा हा निवडणूक जाहीरनामा संकल्पपत्र म्हणून गुजरात प्रदेश भाजपच्या कार्यालयात प्रकाशित करण्यात आला. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल. प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्यासह अन्य वरिष्ठ भाजप नेते यावेळी उपस्थित होते.
कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षाने या आधीच आपले निवडणूक जाहीरनामे प्रकाशित केले आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबर रोजी होणार असून त्यासाठीचा प्रचार 29 डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळे हा प्रचार संपण्यास आता जेमतेम तीन दिवस राहिले असताना भारतीय जनता पक्षाने आपला निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला आहे. यात 20 लाख रोजगार आणि विद्यार्थिनींना स्कूटीसह इतरही अन्य आश्वासने देण्यात आली आहेत.
त्यात प्रामुख्याने कृषी क्षेत्राच्या विकासासाठी दहा हजार कोटी रुपयांचा निधी देणार, पाटबंधारे प्रकल्पांसाठी 25 हजार कोटी रुपये खर्च करणार, दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रात दोन सीफूड पार्क स्थापन करणार, गोशाळांच्या मदतीसाठी पाचशे कोटी रुपये देणार, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत कुटुंबाच्या वैद्यकीय उपचारासाठी दहा लाख रुपये देण्याची तरतूद केली जाणार आहे.